अजित पवार बुधवारी शहापुरात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:57 AM2019-07-15T00:57:59+5:302019-07-15T00:58:09+5:30
शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने तेथील पक्षांची घडी विस्कटली आहे.
ठाणे : शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने तेथील पक्षांची घडी विस्कटली आहे. याप्रमाणेच मुरबाडमध्येही राष्टÑवादीत चलबिचल सुरू आहे. या बालेकिल्ल्यांचे ढासळत असलेले बुरूज वेळीच सावरून शिवसेनेला रोखण्यासह विखुरलेल्या राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी राष्टÑवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे शहापूरला १७ जुलैला येऊन मोठी सभा घेणार आहेत. त्यासाठी गर्दी जमवण्याची तयारी सध्या जोर धरू लागली आहे.
राष्टÑवादी सोडून पक्षाचे आमदार शिवसेनेत जाताच पक्षाच्या एका गटाने बारामतीत जाऊन पवार यांची भेट घेऊन ग्रामीण जिल्हाध्यक्ष व तालुकाप्रमुख यांच्या कामगिरीचा पाढाच पवारांना ऐकवला आहे. यामुळे भेटीदरम्यान अध्यक्षांसह तालुकाप्रमुखांचीदेखील झाडाझडती घेण्याचे पवार यांनी कार्यकर्त्यांना ऐकवले आहे. यामुळे बुधवारी मोठ्या सभेच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्टÑवादी काँग्रेसच्या ग्रामीण नेतृत्वबदलाचे वारेदेखील वाहू लागले आहेत. तर, जबाबदारी स्वीकारून राष्टÑवादीचा बालेकिल्ला पूर्ववत करण्याचा विडा उचलणाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सभेची तयारी सुरू केली आहे.
स्वपक्षाचे आमदार असतानाही येथील राष्टÑवादीच्या नेत्यांनी पेसा कायद्याविरोधात रान उठवले. शहापूर विधानसभा मतदारसंघ १०० टक्के पेसामध्ये समाविष्ट आहे. सर्वाधिक आदिवासी समाज असल्यामुळे पेसा कायद्याखाली येथील ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुकांसाठी आदिवासींना प्राधान्याने उमेदवारी मिळत आहे. याचा राग मनात ठेवून राष्टÑवादीच्या येथील नेत्यांनी आदिवासी समाजहिताविरोधात पेसा कायदा बंद करण्याचा उपक्रमच राष्टÑवादीने हाती घेतला. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेचे सदस्यदेखील निवडणुकीत पडले. आमदारकीलादेखील पक्षाच्या पेसाविरोधाचा फटका बसण्याची भीती लक्षात घेऊन वरिष्ठ नेत्यांना त्याची कल्पना देऊन बरोरा यांनी राष्टÑवादी सोडून आता शिवसेनेशी घरोबा केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बुधवारी शहापुरात
येत आहेत.