फडणवीस चषकाच्या सोहळ्यात अजित पवारांचा फोटो झळकला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:23 AM2019-12-29T02:23:11+5:302019-12-29T06:27:03+5:30

कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यानचा प्रसंग

Ajit Pawar's photo was unveiled at the Fadnavis Cup ... | फडणवीस चषकाच्या सोहळ्यात अजित पवारांचा फोटो झळकला अन्...

फडणवीस चषकाच्या सोहळ्यात अजित पवारांचा फोटो झळकला अन्...

Next

कल्याण : कल्याणमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बॅनरवर फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे छायाचित्र झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कबड्डी सामन्यांचे आयोजक भाजपचे आ. गणपत गायकवाड हे आहेत. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते फडणवीस हजर होते. ते बोलत असताना त्यांच्या मागे अजित पवार यांचे असलेले छायाचित्र नजरेत भरत होते.

कबड्डी सामन्यांकरिता दिला जाणारा चषक हा फडणवीस यांच्या नावे असल्याने ते उद्घाटनाच्या सोहळ्याला आवर्जून हजर राहिले. फडणवीस बोलत असताना मागेच अजित पवार यांचा फोटो असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी कुजबुज सुरू झाली. राज्यात सत्तास्थापनेचे नाट्य सुरू असताना फडणवीस व पवार यांचा झालेला शपथविधी राज्यातच नव्हे तर देशभर गाजला होता. ‘हवापाण्या’च्या गप्पा राज्यातील सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करून गेल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात अपेक्षित असून अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद व गृहखाते मिळणार का, यावरील पडदा अजून उठलेला नाही. पवार यांना सिंचन घोटाळ्यात अलीकडेच दिली गेलेली क्लीन चिट मागील फडणवीस सरकारनेच दिली होती, असा खुलासा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचे छायाचित्र फडणवीस चषकाच्या सोहळ्यात झळकणे हा निव्वळ योगायोग नाही. राज्यातील सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी भाजप अजित पवार यांच्या त्या शपथविधी सोहळ्यातून भाजपशी त्यांच्या निर्माण झालेल्या जवळिकीचा खुबीने वापर करीत असल्याचे बोलले जात आहे.

बॅनरवरील अजित पवार यांच्या छायाचित्राचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. पवार हे कबड्डी महासंघाचे अध्यक्ष असल्याने त्यांचे छायाचित्र लावले आहे.
-आ. गणपत गायकवाड, आयोजक, फडणवीस चषक कबड्डी स्पर्धा, कल्याण

Web Title: Ajit Pawar's photo was unveiled at the Fadnavis Cup ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.