डोंबिवली : औद्योगिक उपयोगासाठी वापरला जाणारा बर्फ हा अखाद्य प्रकारात मोडतो. मात्र, या बर्फाचा वापर सरबत आणि रसविक्री करणाऱ्या दुकानांतून सर्रासपणे केला जातो. त्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या खात्याचे दुर्लक्ष होते आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ग्रामीण भागात अखाद्य बर्फाचा वापर केला जात आहे. अखाद्य बर्फ हा आरोग्यास हानिकारक आहे.कल्याण आणि डोंबिवली तसेच अन्य आसपासच्या रेल्वेस्थानकांत लिंबूसरबत तयार करणाºया गाड्यांवर अखाद्य बर्फ सर्रासपणे वापरला जातो. त्याचबरोबर रसवंतीगृहातदेखील याच बर्फाचा वापर होतो. अनेक हातगाड्यांवर बर्फाचा गोळा तयार केला जातो. तो याच बर्फाच्या साहाय्याने. त्यावर रंग टाकून तो रंगीबेरंगी गोळा खाण्यास दिला जातो. हा अखाद्य बर्फ खाण्यासाठी नसून औद्योगिक कारखान्यात उत्पादने टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.कल्याण-डोंबिवली परिसरात आइस फॅक्टरी आहे. त्यात हा बर्फ तयार केला जातो. तो कारखान्यांसाठी वापरला जाणे क्रमप्राप्त आहे. मात्र, त्याच बर्फावर रसवंतीगृहे, गोळ्यांच्या गाड्या आणि लिंबूसरबताचा व्यवसाय चालतो. अखाद्य बर्फापासून तयार केलेली सरबते, बर्फाचे गोळे हे आरोग्यास हानिकारक आहेत. अखाद्य बर्फ हा अशुद्ध पाण्यापासून तयार केला जातो.या अखाद्य बर्फाचा वापर टाळण्यासाठी राज्य सरकारने एक अध्यादेश काढला आहे. १ जूनपासून अखाद्य बर्फाचा रंग निळा असावा, असे त्यात आदेशित करण्यात आलेले आहे. त्यामुळे अखाद्य बर्फ तयार करणारे कारखाने १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करतात की नाही, हे महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी अन्न आणि अौषध प्रशासनाकडून अखाद्य बर्फाचा वापर करणाºयांवर काहीच कारवाई केली जात नाही, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. १ जूनपासून अखाद्य बर्फाला निळा रंग दिल्याने तो ओळखता येणार असला, तरी तो बाजारात विकला जाऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणा काय कारवाई करणार, याविषयी अस्पष्टता दिसते आहे.
अखाद्य बर्फाची शहरात सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:25 AM