ठाणे : मुंबईतील मानखुर्द बालसुधारगृहात मागील पाच- सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या अकोल्यातील रोहन (१२) हा अखेर ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्डस् प्रोटेशन युनिटच्या मदतीने शुक्रवारी अकोल्यातील स्वगृही परतला. आॅपरेशन मुस्कान या मोहिमेतंर्गत ठाणेपोलिसांचे पथकाने रोहनने दिलेल्या अकोल्यातील अकोट फाईल, हनुमान मंदीर माहितीच्या आधारे त्याच्या पालकांचा शोध घेतला. त्यावेळी त्याचे वडील हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून ते एक्स्प्रेस गाड्यांमध्ये खेळणी विकत असल्याचे समोर आले. त्यांचा शोध घेण्यात अकोल्यातील पोलीस हवालदार अनिल गेंदे यांची मदतही तितकीच महत्त्वाची ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकीकडे गणेशोत्सवाची धामधुम सुरू होती. याचदरम्यान रोहन हा आपल्या वडिलांसोबत अकोला रेल्वे स्थानकात खेळणी विकण्यासाठी गेला होता. ते दोघे हावडा एक्स्प्रेसमध्ये चढले. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला त्यांच्या नियोजित बोगी झोपण्यास सांगितले. मात्र,तो दुसऱ्या बोगीत जावून झोपल्याने त्यांची ताटातूट झाली आणि तो थेट मुंबईतील कुर्ला येथे पोहोचला. दरम्यान, कु र्ला रेल्वे स्थानकात उतरल्यावर तेथे फिरताना तो रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्याला मानखुर्द येथील बालसुधारगृहात नेले. तेथे गेल्यावर विचारपूस केल्यावर त्याला राहत्या घराचा पत्ता व्यवस्थीत सांगता येत नव्हता. फक्त अकोट फाइल, हनुमान मंदिर असा अर्धवट पत्ता तो सांगत होता. याचदरम्यानअपहरण आणि हरवलेल्या मुलांचा शोध घेऊनत्यांना स्वगृही धाडण्यासाठी गृह विभागामार्फत ‘आॅपरेशन मुस्कान ’ही विशेष मोहिम १ डिसेंबर सुरू केली. त्याअंतर्गत शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे,पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोनावणे यांच्या पथकाने शोध मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार, पोलीस हवालदार नथुराम चव्हाण, पोलीस नाईक रोहिणी सावंत, प्रमोद पालांडे, पोलीस शिपाई कैसर मुल्ला, मोहम्मद मुलाणी हे बालसुधारगृहात इतर मुलांप्रमाणे रोहन याच्यापर्यंत माहिती घेत पोहोचले. त्यावेळी त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अकोल्यातील पोलीस ठाण्यात फोन करून त्याबाबत माहिती घेत होते.याचदरम्यान,या पथकाने अकोला येथील पोलीस हवालदार अनिल गेंदे यांनाही त्याची माहिती दिली.त्यांनी त्याबाबत शोध घेऊन थेट त्याच्या भावाशी बोलणे करून दिले.त्यानुसार शुक्रवारी रोहन याचा भाऊ आणि वडिल ठाण्यात आल्यावर तो त्यांच्यासह स्वगृही परतल्याचे ठाणे शहर पोलिसांनी सांगितले.