ठाणे : नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक स्पर्धेत ठाण्याच्या अक्षय खोतने चमकदार कामगिरी करीत अव्वल स्थान पटकाविले आहे. अक्षयने १०० आणि २०० मीटरमध्ये पहिले स्थान मिळवले.
ही स्पर्धा २ आणि ३ सप्टेंबर रोजी नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती.
अक्षयने १०० मीटरसाठी १०.८४ सेकंद आणि २०० मीटरसाठी २१.८८ सेकंद वेळ घेतला. दोन्ही स्पर्धांवर त्याचे वर्चस्व होते. बऱ्याच काळानंतर ठाणे जिल्ह्यातील एक क्रीडापटू वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये प्रथम आला आहे, असे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी सांगितले. अक्षय त्याच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या कामगिरीने प्रभावी ठरला आहे. तो अचिव्हर्स स्पोर्ट्स क्लबमध्ये पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. अक्षयने एसएएफ गेम्स १६, गुवाहाटी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि कांस्यपदक मिळवले. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी तो महाराष्ट्र राज्य अथलेटिक संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत.