लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : उल्हास नदी खोऱ्यातील पुरातन वस्तूंचा अनमोल खजिना जतन करणाऱ्या अश्वमेध फाऊंडेशनच्या वस्तुसंग्रहालयात आता विविध क्षेत्रांत महान कार्य करणाऱ्या किमयागारांच्या हातांची प्रतिकृती जतन केली जाणार आहे. या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सर्जन व सुमारे दोन लाख डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणारे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाताची प्रतिकृती घेऊन नुकतीच करण्यात आली. या उपक्रमासाठी फाउंडेशनला टिटवाळ्यातील प्रसिद्ध मूर्तीकार प्रशांत गोडांबे आणि ॲड. जयेश वाणी आदींची मोलाची मदत मिळाली आहे.
उल्हास नदी खोऱ्यातील संस्कृतीचे जतन, ऐतिहासिक ठेवा, वस्तू, शेतीअवजारे तसेच तेथील नागरिकांचे राहणीमान कसे होते, याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी हरड व त्यांचे सहकारी अश्वमेध फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. फाऊंडेशनच्या वस्तुसंग्रहालयासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने फाऊंडेशनतर्फे मुरबाड तालुक्यातील बेलपाडा येथे वस्तुसंग्रहालयाची नवीन वास्तू साकारण्यात येत आहे.
फाऊंडेशनच्या कार्याला पुढे घेऊन जाण्याचे काम हरड यांच्या बरोबरीने गोडांबे व वाणी यांनी हाती घेतले आहे. त्यात लाईफ लिजंड असणाऱ्यांच्या हातांचे ठसे, प्रतिकृती जतन केली जाणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा उपलब्ध आहे, तर लंडनच्या मादाम तुसादपासून लोणावळ्याच्या संग्रहालयात अनेक महान माणसांच्या मेणाचे पुतळे बघायला मिळतात. याच धर्तीवर गोडांबे यांनी लोकोत्तर कार्य करणाऱ्यांचे ‘हात’ पुढच्या ५०० वर्षांसाठी जतन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याची सुरुवात लहाने यांच्या हाताची प्रतिकृती घेण्यापासून सुरू झाली आहे. टिटवाळा अथवा बेलापाडा येथील नवीन वास्तूत हे ‘हात’ जतन केले जाणार आहेत.
दरम्यान, लहाने यांच्या हाताचे ठसे मिळविण्यासाठी ॲड. जयेश वाणी, सामाजिक कार्यकर्ते संजय पारेकर आणि ॲड. संजय भोजणे यांनी विशेष मेहनत घेतली.
लवकरच खुला होणार खजिना
- ११ मार्चला महाशिवरात्रीदिवशी जे. जे. रुग्णालयात लहाने यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हातावरील अत्यंत बारीक खुणाही या प्रक्रियेद्वारे जतन केल्या जातात. बायोमेट्रीक सुरक्षा पाळण्यासाठी बोटांचे ठसे पुसून टाकून बाकी हाताचा हुबेहुब ठसा मिळवण्याचे कसब गोडांबे यांनी प्राप्त केले आहे.
- लाखो दृष्टिहिनांच्या आयुष्यात देवदूताचा स्पर्श लाभलेल्या लहाने यांनी उजेडाची कवाडे उघडी केली आहेत. लाखोंना प्रकाशाची जाणीव आणि रंगांचा आनंद मिळवून देणारे हात पुढच्या ५०० वर्षांतील पिढ्यांना केवळ बघायलाच मिळतील असे नाही, तर भावी पिढ्यांना प्रेरणाही मिळवून देतील.
- लहाने यांच्या हाताचे ठसे, प्रतिकृती टिटवाळ्यातील वस्तूसंग्रहालयात लवकरच सर्वसामान्यांना बघण्यासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती देण्यात आली.
---------------