ठाणे : अलिबाग येथे रंगलेल्या ‘कवी आगरात-सागरात’ या आगरी-मराठी भाषेतील कवी संमेलनाला वेगळेच स्वरुप प्राप्त झाले. या संमेलनाचे खास वैशिष्ट्ये ठरले ते पोपटी संमेलन व तरंगते काव्य संमेलनाने. या मैफलीत लोकगीत, मराठी मुक्त कविता तसेच सुरेश भटांना मानवंदना देण्यासाठी गझलही सादर झाल्या. बोली भाषा टिकावी, जतन व्हावी आणि रसिकांपर्यंत पोहचावी यासाठी कवी गजानन पाटील, प्रकाश पाटील, सर्वेश तरे हे ठिक-ठिकाणी काव्यमैफील सादर करीत असतात. याच मैफिलीला महास्वरुप देऊन आगरायन प्रस्तुत ‘कवी आगरात-सागरात’ हे आगरी-मराठी भाषेतील दोन दिवसीय कवी संमेलन अलिबाग येथील मांडवा बंदरावर नुकतेच संपन्न झाले. पहिल्या दिवशी ‘पोपटी संमेलन’ पार पडले. यावेळी कवींनी मैफलीत कवीतांबरोबर पोपटीचाही आस्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी ‘तरंगते काव्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. मांडवा येथील समुद्रात जाऊन कवींची ही तरंगती कवितांची मैफल जोशात पार पडली. या संमेलनाची सुरुवात गीतकार-गायक दया नाईक यांच्या कुलदैवतांना नमन करणाऱ्या गीताने झाली. तर काव्यमैफलीची सुरुवात म.वा म्हात्रे यांनी प्रासंगिक काव्य करुन केली. त्यानंतर काशिनाथ पाटील यांनी ‘हवेत किती’ या मार्मिक कवितेचे सादरीकरण केले. प्रकाश पाटील यांनी मुक्त छंदातील कविता सादर करीत सर्वांना वेगळ््या वातावरणात नेले. मोरेश्वर म्हात्रे यांच्या कवितेने अनेक सवाल उपस्थित केले. कवी रामनाथ म्हात्रे यांना आगरी भाषेतील ‘या पोरांना पायजेन सतरा पोरी’ ही विनोदी कविता तर गजानन पाटील यांनी आगरी भाषेत विडंबन काव्य ‘बघ तुला माझी आठवण येते का’ सादर केले तसेच त्याच ढंगातील प्रेम कविता नाईक यांनी सादर करून आणखीनच बहार आणली. (प्रतिनिधी)
अलिबागेत ‘कवी आगरात-सागरात...’
By admin | Published: April 20, 2017 4:02 AM