मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच या पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणूनही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोमवारीच मशाल हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह घरोघर पोहोचविण्याठी या गटाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आलेल्या या प्रस्तावाला निवडणूक आयोग मान्यता देत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
शिंदे गटाला दोन तलवार व ढाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटातील नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुर्जनाचा नाश करण्यासाठी तलवार आणि सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला ढाल मिळाली आहे. राज्यात शिवसेनेला ठाण्यातून पहिली सत्ता मिळाली होती, तेव्हाही ढाल तलवार हिच निशाणी होती, असं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी देखील ढाल तलवार आहे. आनंद दिघे साहेबांचे आर्शिवाद आमच्यासोबत आहेत. सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ढाल म्हणुन उभे राहणार असून तळपती तलवार मुख्यमंत्र्यांच्या हाती देणार असल्याची माहिती मीनाक्षी शिंदे यांनी दिली.
‘सूर्य’ का नाही?
शिंदे गटाने ई-मेलद्वारे मंगळवारी पसंतीक्रमानुसार चिन्हाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता. यात ‘सूर्य’ या चिन्हाला पहिली पसंती दिली होती. परंतु हे चिन्ह मिझोरामच्या एका प्रादेशिक पक्षाला दिलेले असल्याने ते चिन्ह आयोगाने नाकारले. दुसरे चिन्ह त्यांनी ढाल-तलवार मागितले होते. हे चिन्हही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट नाही. परंतु या चिन्हाशी साधर्म्य असलेले ‘दोन तलवार व एक ढाल’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे.