ठाणे : ठाणे पोलिसांनी एका कारवाईमध्ये जप्त केलेले सर्व सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) बोगस असल्याचे पनामा दूतावासाने स्पष्ट केले आहे. शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले सीडीसी बनावट छापून, त्यांची विक्री करणा-या आरोपींना पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. अब्दुल्ला मनत्तुमपाडत हकीम, विजयन गोपाल पिल्ले आणि अलीम मोहद्दीन मुसा यांना २ आॅगस्ट रोजी, तर सूत्रधार प्रदीप उर्फ दिनेश शंकर रौधळ याला गुरुवारी अटक केली.आरोपींकडून पोलिसांनी ३७ बनावट सीडीसी जप्त केले होते. पनामा दूतावासाच्या मुंबई कार्यालयाकडे ठाणे पोलिसांनी चौकशी केली असता, सर्व सीडीसी बनावट असल्याचे दूतावासाकडून स्पष्ट झाले. पनामा दूतावासाने त्यांच्याकडील दस्तावेज तपासले असता, आरोपींनी बनावट सीडीसी तयार करताना, त्यावर काही वैध सीडीसींचा क्रमांक टाकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपींकडून २६ वैध पासपोर्ट जप्त केले. ते मुख्यत्वे केरळच्या रहिवाशांचे असून, ते यासाठी आरोपींशी संपर्कात असावेत, असा संशय आहे. त्या सर्वांची चौकशी होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
आरोपींकडून जप्त सर्व सीडीसी बोगसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 4:03 AM