उल्हासनगर : अनेक समस्यांचे माहेरघर असलेल्या उल्हासनगरमधील अनेक प्रश्न गेल्या दहा वर्षांत सुटलेले नाहीत. त्याचा जाब द्यावा लागेल, या भीतीपोटी बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी प्रचारात उल्हासनगरकडे पाठ फिरवली आहे. येत्या पाच दिवसांतही मोठ्या नेत्यांच्या फारशा सभा होणार नाहीत, अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील नेते, स्थानिक नेत्यांच्याच खांद्यावर प्रचाराची भिस्त आहे. त्यातही अनेक नेत्यांनी ठाण्यातूनच उल्हासनगरलाही संबोधित केल्याने नेत्यांसाठी हे शहर अजूनही बहोत दूर आहे.त्यातही भाजपाने सत्तेच्या समीकरणांत उलथापालथ घडवल्याने राष्ट्रवादीला फटका बसला आहे. त्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख नेते प्रचारापासून दूर आहेत. एकीकडे ओमी टीमला सोबत घेऊन पक्षाची बाजू मजबूत केली असली, तरी ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या मुद्द्यावर कोंडी होऊ नये, म्हणून भाजपाचे प्रमुख नेते प्रचारासाठी येणार नाहीत. त्यातल्या त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुधवारी चार चौकसभा ठेवण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.पालिकेवर सत्ता आपल्याच पक्षाची हवी, असे जरी प्रत्येक पक्षाला वाटते असले तरी येथील प्रश्नांवर भाष्य करण्यास कोणत्याही पक्षाला वेळ नसल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजीत पवार आदीच्या ठाण्यासोबत सभा होणार असे सांगितले जात होते. मात्र ठाण्यातील सभा झाल्यावरही प्रमुख नेते उल्हासनगरकडे फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)
सर्वच पक्षप्रमुखांची उल्हासनगरकडे पाठ
By admin | Published: February 15, 2017 4:38 AM