अजित मांडके / ठाणेयुती होईल किंवा नाही, मात्र बंडखोरीचा फटका आपल्याला बसेल, अशी भीती शिवसेनेला वाटत असल्याने प्रत्येक प्रभागातील सर्व इच्छुकांना प्रचारास खुली सूट देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना व अन्य काही पक्षांमधील इच्छुकांनी आपापल्या प्रभागांत प्रचार सुरू केला असून पक्षाला उमेदवारी मिळवण्याकरिता प्रचारातील आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न इच्छुक करीत आहेत. अशा इच्छुकांना रोखले तर त्यामुळे असंतोष वाढेल, हे लक्षात आल्याने शिवसेनेने इच्छुकांना प्रचारास खुली सूट दिली आहे. यामुळे शिवसेनेचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचेल. भाजपाने ऐनवेळी युती तोडली, तरी यापूर्वी शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवार, असा प्रचार केलेल्या इच्छुकाला भाजपात जाऊन तिकीट मिळवून पुन्हा त्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करताना अडचणी येतील, असे शिवसेनेतील जाणकारांचे मत आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. शिवसेनेत साडेपाचशेहून अधिक इच्छुक आहेत. प्रस्थापित नेत्यांच्या तब्बल ७० कुटुंबीयांनी तिकीट मागितल्याने आता कोणाच्या पारड्यात तिकीट जाणार आणि कोणाचा पत्ता कटणार, हे सांगणे कठीण आहे. एकेका प्रभागातून २० ते २५ इच्छुकांची फळी उभी आहे. यातून केवळ चारच इच्छुकांना पक्षाचे अधिकृत तिकीट मिळणार आहे. मागील निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. परंतु, तरीदेखील शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागला होता. काहींनी अपक्ष म्हणून लढत देऊन शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना घाम फोडण्याचे काम केले होते. दरम्यान, आता चार पॅनलचा एक वॉर्ड झाल्याने इच्छुकांनी आपला प्रचार सुरू करून पक्षावर उमेदवारीकरिता दबाव वाढवला आहे. घरात तीनतीन तिकिटे द्या, नाहीतर भाजपामध्ये जातो, असा दबाव आणण्यास काही इच्छुकांनी सुरुवात केली आहे. हा दबाव झुगारून देण्याकरिता शिवसेनेने इच्छुकांना प्रचार सुरू करण्यास सांगितले आहे. उलटपक्षी अवश्य प्रचार करा, अशी तंबी इच्छुकांना दिली आहे.
सारेच इच्छुक प्रचाराच्या मैदानात
By admin | Published: January 28, 2017 2:44 AM