अनिकेत घमंडी, डोंबिवली कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आदी प्रमुख पदांची नियुक्ती जवळपास पूर्ण झाली असून ही सर्व पदे कल्याणमधील नेत्यांचा पदरात पडल्याने डोंबिवलीमधील शिवसेना-भाजपाचे नेते कमालीचे नाराज झाले आहेत.महापौरपदाच्या शर्यतीत डोंबिवलीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे आदींसह कल्याणमधील राजेंद्र देवळेकरांसह अन्य काहींची नावे चर्चेत होती. त्यापैकी देवळेकरांना ते पद दिले गेले. त्यामुळे डोंबिवलीतील शिवसेनेच्या गोटात प्रचंड नाराजी पसरलेली होती. तशीच अवस्था भाजपाच्या वाट्याला आलेल्या उपमहापौरपदासंदर्भात आहे. त्या पदासाठीही डोंबिवलीतून श्रीकर चौधरी यांच्या पत्नीसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या विकास म्हात्रे तसेच कल्याणमधील विशाल पावशे आणि विद्यमान उपमहापौर विक्रम तरे यांची चर्चा होती. शिवसेनेचे अनुकरण करीत भाजपानेही उपमहापौरपद कल्याणकरांना दिले. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीकरांना डावलल्याची नाराजी प्रकट झाली. स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही तेच झाले. डोंबिवलीतील काँग्रेसमधून भाजपात आलेल्या शिवाजी शेलार यांच्यासह विकास म्हात्रे यांना डावलून पक्षाने कल्याणमधील संदीप गायकर यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घातली. त्यामुळे शेलार गट तसेच म्हात्रे दाम्पत्य नाराज झाले. म्हात्रे दाम्पत्याने गैरहजर राहत ती नाराजी उघड केली. सत्तेतील सर्व प्रमुख पदे कल्याणकरांना दिली गेल्याने दोन्ही पक्षांमधले डोंबिवलीकर नाराज असून धुसफूस वाढली आहे. भाजपाला डोंबिवलीने संजीवनी देत महापालिकेत २१ नगरसेवक निवडून दिले. तरीही, पक्षाने कोणतेही महत्त्वाचे पद या शहराला का दिले नाही, असा सवाल केला जात आहे.शिवसेनेच्या मोरेंना दोन पदे का? एकीकडे भाजपामध्ये अंतर्गत नाराजी - धुसफूस सुरू असतांनाच शिवसेनेतही दबक्या आवाजात राजेश मोरे यांना पक्षाने दोन पदे का दिली, याबाबतची चर्चा सुरू आहे. मोरे हे स्थायीचे सदस्य आहेत आणि त्यासोबतच महापालिकेचे सभागृह नेतेही आहेत. त्यातील एक पद एखाद्या डोंबिवलीकराला देता आले असते किंवा पक्षातील ज्येष्ठांना न्याय देता आला असता, अशीही चर्चा सुरू आहे. स्वत: मोेरेंनाही दोन पदे मिळतील, अशी अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया खुद्द मोरे यांनीच प्रसिद्धिमाध्यमांना दिली होती.दुसरीकडे भाजपामध्येही डोंबिवलीतील माजी उपमहापौर राहुल दामले यांना स्थायीच्या सदस्यपदासह सभापतीपद मिळावे, ही त्यांची अपेक्षा असल्याचेही सर्वश्रुत होते. पण, तसे झाले नाही. ते का झाले नाही, दामले यांना का डावलण्यात आले, आगामी काळात त्यांना महापौरपद दिले जाणार आहे किंवा कसे? पक्षश्रेष्ठींच्या मनात त्यांच्यावर आणखी काही जबाबदारी टाकण्याचा विचार आहे का? ते स्पष्ट झालेले नाही.
केडीएमसीत सर्व सत्ता पदे कल्याणकरांना
By admin | Published: January 08, 2016 2:01 AM