ठाणे : ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला निवडणुकीत चितपट करण्याकरिता भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे हे सारे पक्ष आतुर असल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.प्रचाराची रणधुमाळी, आरोप-प्रत्यारोप, बंडखोरी, सभा, रोड शो अशा घडामोडींनी पुढील काही दिवस या दोन्ही शहरांतील वातावरण ढवळून निघणार आहे. ठाणे महापालिकेतील सत्ता स्वबळावर प्राप्त करणे अनेक वर्षे प्रयत्न करूनही शिवसेनेला शक्य झालेले नाही. या वेळी राज्यातील सत्तेतील प्रमुख पक्ष असलेला भाजपा शिवसेनेला बहुमताकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसेल, असे संकेत प्राप्त होत आहेत. त्यामुळे आतापर्यंत दिसणारा युती विरुद्ध आघाडी असा संघर्ष या वेळी असेल.गेली १५ वर्षे सत्तेत असल्याने बाळसे धरलेली राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका निवडणुकीत तोळामासा झाली आहे. ठाण्यात या पक्षाला फटका देण्याचा प्रयत्न भाजपा करील. मनसेचे कार्यकर्ते सध्या बुडते जहाज सोडून पळ काढत असल्याने भाजपा त्या पक्षालाही धक्का पोहोचवेल, अशी शक्यता आहे. बदललेली प्रभागरचना, मुंब्रा-दिवा परिसरातील वाढलेले वॉर्ड यामुळे तेथील नवी राजकीय समीकरणे निकालानंतरच स्पष्ट होतील. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसलेला नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अडीच वर्षांच्या सत्तेनंतर टिकून आहे किंवा कसे, याचे उत्तर येथील निकाल देणार असून नोटाबंदीचा निर्णय फायद्याचा की तोट्याचा, या प्रश्नाचे उत्तरही या दोन्ही शहरांतील निकालाद्वारे मिळणार आहे.उल्हासनगरात शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचेच आव्हान राहिले आहे. मात्र, ओमी कलानी हे भाजपामध्ये सहभागी झाले, तर त्यांच्या खांद्यावर बसून भाजपा शिवसेनेशी दोन हात करील. (प्रतिनिधी)गाजणारे मुद्देठाणे महापालिका निवडणूक१) क्लस्टरचे गाजर २) बिल्डर सुरज परमार आत्महत्या ३) डम्पिंग ग्राउंड व कचरा विल्हेवाटीची समस्या ४) ठाणे परिवहनसेवेचा बोजवारा ५) कळवा खाडीकिनाऱ्यावरील अतिक्रमणेउल्हासनगर महापालिका निवडणूक१) मुबलक पाणीपुरवठा होऊनही तीव्र टंचाई२) रस्त्यांची दुरवस्था३) डम्पिंग ग्राउंड व कचरा विल्हेवाटीची समस्या४) भुयारी गटार योजना५) राजकारणाचे गुन्हेगारीकरण
सेना विरुद्ध सारे असाच संघर्ष
By admin | Published: January 12, 2017 6:55 AM