ठाणे: एकांकिका जास्त प्रमाणात पाहिल्या जातात. त्याला जास्त गर्दी होते. आणि ज्यावेळी मी नाटक घेऊन महाराष्ट्रात वा भारतभर फिरत असतो त्याची फारच क्वचित प्रमाणात चर्चा होते वा ते प्रयोग पहायला एकांकिकांच्या तुलनेत कमी गर्दी होते. नाटक करणे हा रियाज आहे. तो चालू राहणे ही जबाबदारी ज्याची त्याची आहे. सगळेच टी. व्ही, सिनेमे यात रमू शकत नाहीत अशा भावना सुप्रसिद्ध रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केल्या.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित ठाणे आर्ट गिल्डच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त पहिला राज्यस्तरीय ‘टॅग कलागंध पुरस्कार’ झुंजारराव यांना अभिनेते कुशल भद्रिके यांच्या हस्ते आणि विश्वस्त विजू माने, रवि जाधव, अशोक नारकर, अध्यक्ष महेश शानभाग, सचिव श्रीरंग खटावकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पगडी, शेला, एक लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
टॅग ही संस्था खऱ्या अर्थाने सोने आहे. कलकारांबरोबर उत्तम रसिकही टॅग घडवित असल्याच्या भावना बद्रिके यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठींब्याने हा पुरस्कार दिला जात असल्याचेही यावेळी नमूद केले. दरम्यान, विजू माने यांच्या ‘काय म्हणायचं यांना बोलून चालून कलाकार’ या कवितेला रसिकांची टाळ्यांची दाद मिळाली. या कार्यक्रमाची सुरुवात सुजाता जोशी यांच्या नांदीनृत्याने झाली. टॅग- स्वरगंधच्या श्रीराम नरसुळे, मयुरी पुराणिक, अमित निखारगे आणि अनिता जितुरी यांनी रसिकांना गीतांची मेजवानी दिली. ‘सोळकढी’ या शॉर्ट फिल्म साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेली टॅगची तरुण दिग्दर्शिका समीहा सबनीस हिचे कौतुक तर उल्लेखनीय टॅग सदस्य म्हणून स्वराज सावंत आणि रुपेश वेडे यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या ‘विठू रखुमाई’ या नाट्यकृतीवर आधारित हर्षदा बोरकर लिखित, विश्वनाथ चांदोरकर दिग्दर्शित ‘डिट्टो रखुमाई’ एकांकिका सादर झाली. प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर संस्थेच्या सहसचिव सुनिता फडके यांनी आभार प्रदर्शन केले.