ठाणे : गृहनिर्माण संस्थेच्या पदाचा गैरवापर करून एक लाख १० हजारांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी सचिव राणी देसाई या महिलेने न्यायालयासह आपली फसवणूक तसेच दिशाभूल केल्याची तक्रार ‘पुरुषोत्तम प्लाझा’ या सोसायटीच्या कस्तुरी कांबळे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल केली. न्यायालयात त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कलम १५६ नुसार ही तक्रार केली.कस्तुरी कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २००४ पासून त्या घोडबंदर रोड येथील ‘पुरुषोत्तम प्लाझा’मध्ये वास्तव्याला आहेत. सचिव देसाई यांनी ठाण्याच्या सहकार न्यायालयात कांबळे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील कागदपत्रांत रिझोल्युशन आॅफ सोसायटी यामध्ये फेरफार आणि खाडाखोड केली. माहिती अधिकार कायद्याखाली न्यायालयातून मिळालेल्या कागदपत्रांद्वारे ही बाब उघड झाली. कागदपत्रांमध्ये अध्यक्ष मोहन भोईर, सचिव राणी देसाई व खजिनदार म्हणून रवींद्र थिटे यांच्या स्वाक्षºया आहेत. यातील ठराव क्र. ६ सोसायटीतर्फे सचिव राणी यांची नियुक्ती, ठराव क्र. ७ प्रॉपर्टी टॅक्स सदनिकाधारकाच्या नावावर करण्यात यावा, ही वाक्ये आपल्या हस्ताक्षरातील नसल्याचा खजिनदार थिटे यांनी दावा केला. याप्रकरणी न्यायालयामार्फत कासारवडवली पोलिसांत १३ जुलै २०१९ रोजी त्यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून न्यायालयाची जर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले, तर तशी कारवाई होईल. सर्व बाजूंच्या कागदपत्रांचही चौकशी करण्यात येत असून यातील आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचीही पडताळणी केली जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>तीन सभासदांच्या स्वाक्षरीवर केला ठराव मंजूरगणपूर्तीसंख्या सात असणे आवश्यक असताना केवळ तीन सभासदांच्या स्वाक्षरीवर ठराव मंजूर करण्यात आला आहे. तोच न्यायालयात सादर केला. ही बाब सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधीप्रमाणे बेकायदेशीर आहे. यात न्यायालयीन खर्चापोटी एक लाख १० हजारांचे नुकसान झाले. १० जानेवारी २०१६ ते २९ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत राणी देसाई यांनी सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोईर, जयंत देसाई यांनी संगनमताने मानसिक व आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने पदाचा गैरवापर करून न्यायालय आणि आपल्याला फसवल्याचे कांबळे म्हणाल्या.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर केला न्यायालयाची फसवणूक केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:32 AM