नवी मुंबई : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे ऐरोलीचे उमेदवार अंकुश कदम यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. कदम यांच्यासह साथीदारांवर कोपरखैरणे पोलिस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाच्या हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत कदम व त्यांच्या साथीदारांनी भाजपच्या बूथवर केलेल्या हल्ल्यात हा प्रकार घडला.
बुधवारी दुपारच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. मोरे यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा आरोप स्वराज्यच्या पदाधिकाऱ्याने निवडणुकीच्या भरारी पथकाकडे केला होता. तक्रारीनुसार पथकाने त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता काही मिळून आले नाही.
दरम्यान, त्यांच्या कार्यालयाबाहेरच स्वराज्य पक्षाचा एक पदाधिकारी उभा राहून लक्ष ठेवत असल्याने मोरे यांनी त्याच्याकडे उलट चौकशी केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला असता काही वेळात अंकुश कदम हे साथीदारांसह त्या ठिकाणी आले होते. यावेळी दोन्ही गटांत शाब्दिक वाद होऊन झालेल्या मारहाणीत जयेश मोरे जखमी झाला.
दोन्ही गट समोरासमोर आले असता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर समर्थकांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. कार्यकर्त्यानी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली असून वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
राज्यात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत म्हणजे १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान राज्यभरात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी १० हजार १३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने बुधवारी दिली.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू, आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.