ठाणे - ठाणे महानगर पालिका हद्दीतील स्मशाने आणि दफनभूमीत ठेकेदाराकडून कर्मचारी वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी उघडकीस आणला आहे. शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन पालिकेकडून उकळून फक्त एकच कर्मचारी तैनात केला आहे. दरम्यान, स्मशान आणि दफनभूमीतही भ्रष्टाचार करणाऱ्यांची जागा जेलमध्येच आहे. त्यामुळे आयुक्तांनी या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांचे ठेके रद्द करावेत, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.
दिवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीत अनागोंदी माजली असल्याची माहिती शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार पठाण यांनी स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका सुलक्षणा पाटील, मा. नगरसेवक हिरा पाटील यांच्यासह फडकेपाडा, खर्डी, शिळफाटा,पडले, डायघर, मोठी देसाई, तांबडीचा पाडा, खिडकाळी, पाटील पाडा, भोलेनाथ नगर या नऊ गावांतील स्मशानांची पाहणी केली. त्यावेळेस हा "कामगार घोटाळा" उघडकीस आला. या स्मशानांची देखभाल, दुरूस्ती आणि सेवा देण्यासाठी अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. या ठेकेदारांनी पालिकेकडून सुमारे २५० कर्मचाऱ्यांचे वेतन उकळून घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात स्मशानांमध्ये प्रत्येकी एकच कर्मचारी तैनात केला आहे. हा एकच कर्मचारी साफ सफाई तसेच अंत्यसंस्कार करीत असल्याचे दिसून आले. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदार आपल्या खिशात घालत असल्याचे पठाण यांनी उघडकीस आणले.
दरम्यान, अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदारांना स्मशानातील साफसफाई, देखभाल याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, ये स्मशान-दफनभूमींची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. येथे सफाईची समस्या आहे. त्यास अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदार हेच जबाबदार आहेत. एकाच कर्मचाऱ्याकडून सफाई आणि अंत्यसंस्काराचे काम करून घेतले जात आहे. या अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदारांनी भ्रष्टाचारातून स्मशाने दफनभूमी लाही सोडले नाही. ही बाब आज आपण आयुक्तांच्या निदर्शनास आणुन देत आहोत. कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झालेला असून त्याची कागदपत्रे आपण संबधितांना सोमवारी सादर करणार आहोत. स्मशान आणि दफनभूमीतही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणार्या या ठेकेदारांचे शाळा सफाई, घंटागाडी, कचरा सफाई आदीचेही ठेके सुरू असून त्या ठिकाणी अडीच हजार कामगार कर्मचारी दाखवले आहेत. त्यामुळे या ठेकेदारीतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. म्हणूनच हे सर्व ठेके रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकावे; त्यांच्या वर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबले पाहिजे, असे पठाण यांनी सांगितले.