मीरा भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत मतदान घोटाळ्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:12 PM2021-05-20T18:12:19+5:302021-05-20T18:14:11+5:30
Mira Bhayander Municipal Corporation : सचिव शिरवळकर यांच्याकडे पक्षनिहाय उपस्थित नगरसेवकांची संख्या विचारली असता त्यांनी भाजपचे ५९, सेनेचे १४ तर काँग्रेसचे ७ असे एकूण ८० नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती दिली.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची महासभा ऑनलाईन चालत असली तरी या ऑनलाईन महासभेत मतदान मोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. तर ऑनलाईन महासभेतील मतदान व मोजणी प्रक्रियेत झालेल्या गडबडीने आता याच्या वैद्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वेळी तहकूब झालेली ऑनलाईन महासभा बुधवारी घेण्यात आलीय यावेळी भाजपाच्या ध्रुवकिशोर पाटील यांनी परिवहन सेवे बाबतचा ठराव मांडला होता . परंतु त्यावर सर्व सदस्यांना चर्चा करायला मिळावी आणि महासभेत रीतसर आणावा असा ठराव भाजपच्याच नीला सोन्स यांनी आणखी एक ठराव मांडला असता त्याला भाजपच्या दौलत गजरे यांनी अनुमोदन दिले.
आमदार गीता जैन सह शिवसेनेने या प्रकरणात सोन्स यांच्या ठरावास समर्थन दिले. त्यामुळे ऑनलाईन महासभेत मतमोजणी घेण्याची पाळी येताच गटनेत्याने त्यांच्या पक्षाच्या नगरसेवक नुसार मतदान धरावे असा अजब प्रकार सुरू झाला. त्याला आक्षेप घेत भाजपातीलच काही नगरसेवकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करून प्रत्यक्ष उपस्थिती प्रमाणे मतदान घ्या अशी मागणी केली. आश्चर्य म्हणजे मतदान प्रक्रिया सुरू असतानाच महापौर ज्योत्सना हसनाळे काहीकाळासाठी उठून निघून गेल्या. त्यांच्या पाठोपाठ आयुक्त दिलीप ढोले, सचिव आदी सुद्धा उठले.
स्क्रीनवर हजर असलेल्या नगरसेवकांची संख्या सांगा अशी मागणी सेनेच्या गटनेत्या नीलम ढवण आदींनी करून सुद्धा सचिव वासुदेव शिरवळकर यांनी टाळाटाळ केली. मतदानाचा मुद्दा येताच सत्ताधारी भाजपातील माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांची धावपळ उडाली. नगरसेवकांना निरोप दिले गेले असे सूत्रांनी सांगितले. या ठरावावर भाजपामध्ये दुफळी पडल्याने मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले. सचिवांनी नंतर मात्र भाजपाच्या पाटील यांच्या ठरावाच्या बाजूने ४२, भाजपाच्या सोन्स यांच्या बाजूने भाजपाच्या काही तर सेनेच्या नगरसेवकांची मिळून ३१ मते पडल्याचे जाहीर केले. तर काँग्रेसचे ७ नगरसेवक तटस्थ राहिल्याचे सचिव म्हणाले.
सचिव शिरवळकर यांच्याकडे पक्षनिहाय उपस्थित नगरसेवकांची संख्या विचारली असता त्यांनी भाजपचे ५९, सेनेचे १४ तर काँग्रेसचे ७ असे एकूण ८० नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती दिली. परंतु ऑनलाईन महासभेत मतदान प्रक्रिया आणि मोजणी दरम्यान घोटाळा झाला असून सचिवांनी पूर्वी प्रमाणेच सत्ताधारीच्या एका वादग्रस्त नेत्याची तळी उचलण्याचे काम चालवले आहे असा आरोप सेनेच्या गटनेत्या ढवण यांनी केला. नियमानुसार मतदान वेळी महासभेला जे हजर असतात त्यांनाच मतदान करता येते. तसेच प्रत्येक नगरसेवकाचे मत नोंदवले जाते. ऑनलाईन महासभेचा सत्ताधारी हे सचिवांच्या संगनमताने गैरफायदा घेऊन गटनेत्यांच्या सांगण्यानुसार मतदान नोंदवतात. तसेच बुधवारच्या महासभे वेळी काही नगरसेवक ऑनलाईन प्रत्यक्ष हजर नसताना सुद्धा त्यांचे मतदान घेण्यात आले . महापौर मतदान प्रक्रिया सुरु असताना काही मिनिटांसाठी उठून गेल्या त्याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना त्यांच्या समर्थक नगरसेवकांना बोलावण्याची संधी साधण्यात आली असे सांगत ढवण यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.