राजू ओढे -ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या वसुलीच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन झालेली असताना, सरकारची वक्रदृष्टी कधीकाळी परमबीर सिंह यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सर्वांकडेच वळली आहे. यातूनच पोलीस दलात बदल्यांचे आदेशावर आदेश निघत असून, त्याचा फटका ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनाही बसला आहे.गेल्या आठवड्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली करण्यात आली. त्याआधी ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह मुंबईच्या काही अधिकाऱ्यांचेही बदलीचे आदेश असेच तडकाफडकी काढण्यात आले. वरिष्ठांकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले मोजके अधिकारी वगळता उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदलीचे खास प्रयोजन नव्हते. या अधिकाऱ्यांनी कधीकाळी परमबीर सिंह यांच्यासोबत काम केल्याने त्यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. हीच ओळख त्यांना भोवली. वास्तविक त्यातील बरेच अधिकारी दीर्घ काळापासून परमबीर सिंह यांच्या संपर्कातही नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्यांची बदली केल्याने परमबीर सिंह यांना त्रास होईल, अशातलाही भाग नाही. गुन्हे अन्वेषण शाखेचे कामकाज सांभाळताना नितीन ठाकरे यांनी बोगस कॉल सेंटरपासून लष्कराच्या पेपरफुटीपर्यंतचे एकापेक्षा एक मोठे गुन्हे उघडकीस आणून ठाणे पोलिसांचा नावलौकिक उंचावला. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही प्रकरणांचा उलगडा त्यांनी या काळात केला. योगायोगाने त्या काळात परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. आता परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याने, सरकारने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात नितीन ठाकरे यांची बदली नंदुरबार येथे जात पडताळणी समितीमध्ये करण्यात आली आहे. प्रशासकीय वर्तुळात अधिकाऱ्यांच्या बदलीकडे केवळ कारवाई म्हणून नव्हे, तर व्यवस्थेची गरज म्हणूनही बघितले जाते. मात्र, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली थेट नंदुरबार येथे आणि तीही पालक शाखेतून काढून जात पडताळणीसारख्या दुय्यम शाखेत केल्यास योग्य संदेश जात नाही. सरकारची ही भूमिका पोलीस दलात अस्वस्थता निर्माण करणारी आहे.
अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचे काय? सरकारी नोकरी म्हटले की, ठराविक काळानंतर बदली आपसूक आलीच. त्यामुळे कधीही बिऱ्हाड हलविण्याची मानसिकता अधिकाऱ्यांची नेहमीच असते. मात्र, परमबीर सिंह यांनी सरकारवर आरोप केल्यानंतर झालेल्या अशाप्रकारच्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सचिन वाझे किंवा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तर या अधिकाऱ्यांचा संबंध नाही, अशा संशयाने त्यांच्याकडे बघितले जात आहे. बदलीपेक्षा सामाजिक प्रतिष्ठेची झालेली हानी या अधिकाऱ्यांसाठी जास्त त्रासदायक ठरत आहे.