ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालकीचा सातबारा असलेला ७२०० चौरस मीटरचा भूखंड पालिकेची परवानगी न घेता कॉसमॉस ग्रुपने परस्पर म्हाडाच्या नावावर केल्याचा गौप्यस्फोट शनिवारी झालेल्या महासभेत विरोधी पक्षातील नगरसेवक अमित सरय्या आणि मिलिंद पाटील यांनी केला. त्यामुळे ही महापालिकेची फसवणूक असल्याने पालिका त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का, असा सवालही त्यांनी केला. विशेष म्हणजे हा फेरफार रद्द करण्यासाठी महापालिकेनेच आता तीन वर्षांनंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्याचीही बाब उघड झाली आहे.महासभा सुरू होताच सरय्या यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे या जागेचे फेरफार नोंदी रद्द करण्यासंदर्भातील पत्रच सभागृहात सादर केले. २०१२पर्यंत येथील गट नं. ५९ अ हिस्सा नं. २ ग/ मौजे चितळसर, मानपाडा येथील हा ७२०० चौरस मीटरच्या जागेच्या भूखंडाचा सातबारा महापालिकेच्या नावे होता. परंतु, त्यानंतर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हा भूखंड कॉसमॉस ग्रुपने म्हाडाच्या नावावर कसा काय हस्तांतरित केला, असा सवाल त्यांनी प्रशासनास केला. तर, यात पालिकेची फसवणूक झाली असून, त्यानुसार संबंधित विकासकावर पालिका गुन्हा दाखल करणार का, असा सवाल मिलिंद पाटील यांनी केला. यासंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, फेरफार नोंदीसंदर्भातील हे प्रकरण असून, महसूल विभागाने कोणत्या आधारे या फेरफार नोंदी बदलल्या आहेत, त्याची तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे ही सर्व माहिती मिळावी म्हणून हा पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यासंदर्भातील माहिती आल्यानंतरच पुढील कारवाई करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉसमॉस ग्रुपवर फसवणुकीचा आरोप
By admin | Published: December 06, 2015 1:16 AM