भिवंडी : नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील काल्हेर येथील गोदाम संकुलात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री कंटेनर चालकाची लुटीच्या हेतूने दोघांनी हत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत काेणताही पुरावा नसताना, भिवंडी गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने आराेपींना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
२९ मे राेजी रात्री राजलक्ष्मी कम्पाउंड काल्हेर येथे नवी मुंबई येथून आझम शाबल अन्सारी (वय २८) हा कंटेनरमध्ये माल घेण्यासाठी येऊन उभा हाेता. मध्यरात्री ताे कंटेनरमध्ये झोपला असताना, तेथे दुचाकीवरून आलेले दोघे कंटेनरच्या केबिनमध्ये शिरले. त्यांची चाहूल लागताच, जाग आलेल्या अन्सारीसाेबत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर, ते निघून गेले होते. मात्र, काही वेळाने पुन्हा येऊन त्यांनी अन्सारीच्या डाेक्यात दगड घालून त्याची हत्या केली. याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणाचा भिवंडी गुन्हे शाखा समांतर तपास करत हाेती. फिर्यादी सत्यप्रकाश सदाशिव मिश्रा याने वादादरम्यान झालेल्या संभाषणाबाबत दिलेल्या माहितीवरून, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे व सहायक पाेलीस उपनिरीक्षक लतीफ मन्सुरी यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नथू पाटील (वय २०, रा.शेलार) याला मिठपाडा येथे सापळा लावून ताब्यात घेतले. त्यानंतर, अल्पवयीन १७ वर्षीय साथीदारासही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. त्यांच्याकडे तीन माेबाइलही सापडले असून, ते १० जून रोजी एका गोदामात झोपलेल्या कामगाराकडून चाेरल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपी पाटील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर चाेरी, चोरी घरफोडी असे सात गुन्हे दाखल आहेत.