ठाणे - घोडबंदर मार्गावर उभारण्यात आलेल्या थीम आणि बॉलीवूड पार्क प्रकल्पातील वादग्रस्त कामाची चौकशी करण्यासाठी ४८ तासात समिती नेमली जाईल, अशी घोषणा सत्ताधारी शिवसेनेने केली होती. मात्र, त्यासंदर्भातील ठराव करु न घेण्यातच सत्ताधाºयांना प्रचंड वेळ लागला आहे. केलेला ठराव शनिवारी सायंकाळी उशिरा सह्यांसाठी पाठवण्यात आल्याने त्यावर सह्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा बागुलबुवा उभा करण्याचे काम शिवसेना करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात या थिम पार्कच्या उभारणीतील सल्लागार तथा ठेकेदार हेच सत्ताधाºयांच्या सोबत फिरत असल्याने या चौकशीचा निव्वळ फार्सच सुरु केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केला आहे. महापालिकेमार्फत मोठा गाजावाजा करत घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीम पार्क प्रकल्पातील कंत्राटी कामाचे अक्षरश: धिंडवडे निघत आहेत. कामाचे आकडे फुगवून या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनेच उघडकीस आणले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी राष्ट्रवादीनेच सर्वप्रथम केली आहे. मात्र, या प्रकरणात आपले हात पोळले जाण्याची शक्यता असल्याने सत्ताधारीच हा ठारव तयार करण्यास वेळकाढूपणा करीत आहेत. तसेच, विरोधी पक्षनेत्यांच्या सहीअभावी हा ठराव रेंगाळला असल्याचे सांगत आहेत. मात्र, शनिवारी तयार केलेला ठराव तत्काळ पाठवणे गरजेचे असतानाही सभागृह नेत्यांनी तो सायंकाळी उशिरा पाठवला. त्यावेळी आपण कार्यालयात नसल्याने त्यावर स्वाक्षरी होऊ शकली नव्हती. आता त्याचा बाऊ केला जात आहे. मात्र, सत्ताधारी पक्षालाच या प्रकरणाची चौकशीची गरज नाही. कारण, या प्रकरणाची चौकशी झाली तर त्यामध्ये हेच लोक अडकण्याची शक्यता अधिक आहे. या पार्कचे ठेकेदार, सल्लागार हे पालकमंत्र्यांसोबत फिरत आहेत. नवरात्रोत्सवाची तयारी करताना हेच लोक पालकमंत्री आणि सभागृह नेत्यांच्या सोबत दिसले आहेत. त्यावरुन या प्रकरणाची चौकशी करण्याचा केवळ फार्स करायचा आहे, हेच दिसून येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ज्यांच्यावर पाटील यांनी आरोप केले आहेत, ते एक कलाकार आहेत, दरवर्षी ते नवरात्रीचा सेट उभारत आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्याच संदर्भात बैठक झाली आहे. उलट आ. जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी त्यांना भेटले असून त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.(नरेश म्हस्के - सभागृह नेते - ठामपा)