अंबरनाथ : अंबरनाथ शहरामध्ये जुगाराचे क्लब चालवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हाय प्रोफाईल अड्डे चालवणाऱ्यांना त्यातून मोठा आर्थिक लाभ होत असल्याने अनेक सराईत गुन्हेगार आणि पोलिसांशी जवळीक साधणारे कथित सामाजिक कार्यकर्तेदेेखील जुगाराचे क्लब भरवित आहेत. पोलिसांना सेक्शन बांधून दिल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही, अशीच समज असून, शहरात दिवसागणिक जुगार चालवणाऱ्या क्लबची संख्या वाढत आहे.
अंबरनाथ शहरामध्ये सुरुवातीच्या काळात मोजकेच जुगाराचे क्लब आणि मटक्याचे अड्डे होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांत जुुगाराचे क्लब चालवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळेच शहरात अनेक अड्डे आजही सुरू आहेत. जुगाराचे अड्डे चालवणारे म्होरके हे पोलिसांना त्यांचा वाटा देऊनच जुगार भरवित आहेत. जुगार चालविणारे पोलिसांचे निकटवर्तीय आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यांना पोलीस ठाण्यात चांगलाच मान मिळतो. जुगाराच्या अड्ड्यांतून पोलिसांनाही लाभ होत असल्याने पोलीस या अड्ड्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असतात. अंबरनाथ स्टेशन परिसरात आता सर्वाधिक जुगाराचे क्लब सुरू असून, या क्लबपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलीस चौकीदेखील आहे. असे असतानाही या क्लबवर कोणतीही कारवाई होत नाही. एवढेच नव्हेतर, जुगाराचे अड्डे चालवणारे आणि मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर अनेक वेळा व्हायरल झाले आहेत. तरीही त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे अद्याप दाखल झालेले नाहीत. पोलिसांची मेहरबानी असल्याने अंबरनाथ शहरामध्ये जुगाराचे अड्डे वाढले आहेत. काही उच्चभ्रू व्यक्तींसाठी खास अड्डे भरविण्यात येतात. मात्र हे अड्डे एखाद्या फार्महाउसवर किंवा एखाद्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये भरविण्यात येतात. चिंचपाडा चौक, स्टेशन रोड, बी केबिनरोड या भागात अनेक क्लब चालविण्यात येतात.
-----------