मीरारोड - मीरारोडच्या शांतिपार्कमधील श्री साई प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या रहिवाश्यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात जाऊन एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत त्रास दिला जात असल्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाका असा संताप व्यक्त करत निवेदन दिले.
मीरारोडच्या शांतिपार्कमधील श्री साई प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या रहिवाश्यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्याकडे आपली व्यथा मांडत निवेदन दिले.
रहिवाश्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोसायटीच्या सार्वजनिक जागेत अतिक्रमण तसेच बेकायदा शेड व बांधकाम प्रकरणी पालिकेकडून एकीकडे कारवाई होत नाही. सोसायटीचे ३५ लाख रुपये मेन्टेनन्स थकवले असून गृहनिर्माण संस्था दुय्यम सह निबंधक यांनी देखील पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत. तर अतिक्रमण करणाऱ्या कडून आम्हाला विविध प्रकारे त्रास दिल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रारी आणि गुन्हे आम्ही दाखल केले आहेत.
रहिवाश्यांना न्याय मिळत नसताना दुसरीकडे मीरारोडच्या एका पोलीस अधिकाऱ्याने रहिवाश्यांच्या विरुद्ध खंडणीच्या खोट्या तक्रारीची शहनिशा न करताच त्रास दिला जात आहे. आम्हीच पीडित असताना आम्हालाच पोलीस त्रास देत असतील तर आम्हालाच जेल मध्ये टाका असे रहिवाश्यांनी चंद्रकांत सरोदे यांना सांगितले. अन्यथा तुमच्या पोलीस ठाण्याबाहेर धरणे धरू असा इशारा रहिवाश्यांनी दिला. अखेर सरोदे यांनी रहिवाश्यांना त्रास होणार नाही असे आश्वस्त केले. तसेच त्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असे रहिवाशी म्हणाले.