उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एकहाती सत्तेसाठी भाजपाने ओमी कलानी यांच्या टीमला पक्षात प्रवेश देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने युती तुटेल, असे स्पष्ट केले. कलानी कुटुंबाचा राजकारणातील वाढता प्रभाव आणि सिंधीभाषक राजकारणामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे.ओमी टीमने भाजपात प्रवेश घेतल्यास युती तुटेल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला असून भाजपाला शह देण्यासाठी रिपब्लिकन पक्षातील आठवले गटाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. मात्र खुद्द रामदास आठवले भाजपाच्या कोट्यातून मंत्री झाल्याने रिपाइंना जाळ्यात ओढण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्नही अद्याप सफल झालेला नाही. ओमी कलानी टीमला प्रवेश दिल्यास भाजपाची उल्हासनगरमध्ये एकहाती सत्ता येईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे. आठवडाभरातच ओमी भाजपामध्ये दाखल होतील. विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्यांची निवडणूक जिंकण्याची क्षमता नसल्याने तो फारसा गांभीर्याने घेतलेला नाही. पक्षाच्या स्थानिक राज्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून ओमी यांचा प्रवेश होईल, असे मानले जाते. भाजपातील नाराजांपाठोपाठ आता शिवसेनेनेही युती तोडण्याचा इशारा दिला आहे. निवडणुकीतील युतीबाबत दोन दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपाच्या नेत्यांची चर्चा झाली. दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ आॅक्टोबरला पुढची बैठक होणार आहे. तोवर ओमी यांना भाजपात प्रवेश दिला जाण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास शिवसेना युतीत नसेल, अशी माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली. त्यामुळे आता पुढील राजकीय गणिते काय राहील, याचे अंदाज बांधण्याचे काम सध्या शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात युती तुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2016 3:31 AM