डोंबिवली : मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना-भाजपाने काडीमोड घेत युती तोडली. निवडणुका स्वबळावर लढवल्या. मात्र, आता हिंदुत्वाचा विचार करून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी इच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. संघाच्या जनकल्याण समितीने गोळवलकर गुरुजी पुरस्कार सोहळ्याची माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ही इच्छा व्यक्त केली. शिवसेना व भाजपा यांनी एकत्र यावे की नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र प्रांत जनकल्याण समितीचे अध्यक्ष रवींद्र साताळकर यांनी थेट उत्तर देणे टाळले असले तरी हिंदुत्ववादी पक्षांनी एकत्रित यावे, अशी इच्छा व्यक्त केली. आधीच मा.गो. वैद्य यांनी शिवसेना-भाजापाने एकत्र येण्याची भूमिका मांडण्यास आणि महापौरपद अडीचअडीच वर्षे वाटून घ्यावे, असे सुचवण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साताळवकर यांच्या या वक्तव्याचा अर्थ हा शिवसेना-भाजपाने एकत्रित राहावे, असाच काढला गेला.महापालिकांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा-शिवसेनेत चढाओढ लागली होती. भाजपाला त्यात चांगले यश आले. त्याला केवळ ठाणे महापालिका अपवाद ठरली आहे. परंतु, दोन्ही पक्ष सत्तेच्या स्पर्धेत उतरले असले, तरी त्यांचा विचार हा सम आहे. हिंदुत्वाचा मुद्दा दोन्ही पक्षांकडे समानत्वाचा आहे. सत्ता ही जरी शिवसेना-भाजपामध्ये भेद निर्माण करणारी ठरली असली, तरी हिंदुत्व हे त्यांना पुन्हा एकत्रित आणू शकते, अशी संघ कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तीच या पत्रकार परिषदेत व्यक्त झाली. (प्रतिनिधी)
‘हिंदुत्वाच्या विचारावर युती व्हावी’
By admin | Published: February 28, 2017 3:30 AM