हितेन नाईक/ पालघर: कोकणामध्ये असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघात काही वर्षांपूर्वी काॅंग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष होता. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचने नंतर काॅंग्रेसची पिछेहाट होऊन तो दुसऱ्या क्रमांकांवर गेला. आजही कोकणात काॅंग्रेसची ब-यापैकी ताकद असतानाही महाविकास आघाडीच्या जागावाटपात संपूर्ण कोकणात सहा जागांपैकी एकही जागा काॅंग्रेसला न देणे हा काॅंग्रेसला कोकणातून संपविण्यासाचा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा डाव आहे. असा आरोप शनिवारी (6 एप्रिल) रोजी किसान काॅंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पराग पष्टे यांनी वाडा येथे पत्रकारांशी बोलताना केला.
कोकणातून काॅंग्रेसला संपविण्यासाचा डावच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या मित्र पक्षांनी केला आहे. या मित्र पक्षांकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही, असा आरोपही पष्टे यांनी यावेळी केला.मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या 2009 च्या लोकसभेच्या भिवंडी मतदार संघातून काॅंग्रेसचे उमेदवार 42 हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यानंतरही या मतदारसंघात सन 2014 व 2019 अशा दोन निवडणुकीत येथे झालेल्या तिरंगी लढतीत काॅंग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची आघाडीतील मित्र पक्षापेक्षा दुप्पट ताकद असतानाही काॅंग्रेसला येथील जागा न देणे हा येथील काॅंग्रेस कार्यकर्त्यांचाच अपमान नव्हे तर नुकताच या भागात भारत जोडो न्याय यात्रेसाठी आलेले देशाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा अवमान असल्याचे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस योगेश नम यांनी सांगितले. दरम्यान कुठल्याही परिस्थितीत कोकणातील भिवंडी व पालघर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत उमेदवार उभे करणारच मग आघाडी धर्म पाळला गेला नाही अशी टीका मित्र पक्षांनी केली तरी त्याची तमा बाळगणार नाही असे पराग पष्टे यांनी यावेळी सांगितले.