नितिन पंडीत
भिवंडी - करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव तीव्र झाल्याने राज्य शासनाने १४ एप्रिल पासून राज्यभर १५ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. मात्र, या लोकडाऊन मुले डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाला सूट द्यावी अशी मागणी भिवंडी पद्मानगर पॉवरलूम व्हीवर्स असोसिएशन व यंत्रमाग व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना संकटामुळे मागील वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय पुरता डबघाईला गेला आहे. त्यातच आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत असताना लॉकडाऊन लागले या भीतीने मागील एक महिन्या पासून स्थलांतरीत मजूर कामगारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. भिवंडीत सुमारे सहा लाख यंत्रमाग असून त्या ठिकाणी सुमारे तीन ते साडे तीन लाख यंत्रमाग कामगार काम करतात. मात्र यावर्षी देखील लॉकडाउन होईल या भीतीने आता पर्यंत अर्ध्याहून अधिक कामगार गावी निघून गेले असून आता भिवंडीत फक्त पन्नास टक्के यंत्रमाग कारखाने सुरू आहेत . अशातच शासनाच्या नव्या लॉकडाऊनच्या अध्यादेशात यंत्रमाग कारखाने सुरू ठेवण्यासंदर्भात स्पष्टता नसल्याने स्थानिक पोलीस यंत्रणेकडून यंत्रमाग कारखाने बंद करण्याचे फर्मान काढण्यात आले असून ज्या यंत्रमाग धारकांकडे निर्यात ऑर्डर आहे त्यांनाच यंत्रमाग कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी देत असून हे चुकीचे असल्याचे भिवंडी पद्मानगर पॉवरलूम व्हीवर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम वंगा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मागील वर्षभर भिवंडी येथील यंत्रमाग व्यवसायिक, मालक व कामगार हे सर्वच आर्थिक डबघाईच्या परिस्थितीने हवालदिल झाले असतानाच आता पुन्हा भिवंडी यंत्रमाग उद्योग बंद झाले तर किमान सहा महिन्यांपर्यंत तरी यंत्रमाग व्यवसाय सुरु होणार नाही अशी भीती यंत्रमाग मालकांनी वयांत केली आहे . त्यातच यंत्रमाग धारक गेल्या वर्षीच्या लॉकडाउन मुळे काढलेल्या कर्जाच्या ओझा खाली दबलेला असून आता जर यंत्रमाग उद्योग बंद झाल्यास पुन्हा उभारण्यास शासनाने यंत्रमाग धारकांना कुठलीही मदत दिल्यास ती मदत देखील कामी येणार नाही. म्हणून सध्या चालू असलेल्या यंत्रमाग उद्योगाला लॉकडान मधून वगळण्यात यावे यासाठी पुन्हा नियमांमध्ये दुरुस्ती करून संबंधित यंत्रणेला कळवावे अशी मागणी केली अध्यक्ष पुरुषोत्तम वंगा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे