सदानंद नाईक
उल्हासनगर - शेजारील शहरापेक्षा कोरोना रुग्णाची संख्या कमी असताना दुकाने उघडण्याचे निर्बंध का? असा प्रश्न व्यापारी संघटनेने करून आंदोलनाचा इशारा दिला. दुकानावर विविध म्हणीचे पोस्टर लावून रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. उल्हासनगरातील फर्निचर मार्केट, जपानी व गजानन कपडा मार्केट, गाऊन मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, जीन्स मार्केट, बॅग मार्केट जिल्ह्यात नव्हेतर राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र कोरोना काळात व्यापाऱ पुरता बुडीत निघाल्याचे आरोप व्यापारी करीत आहे.
इतर शहराप्रमाणे रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास शासन परवानगी देईल, अशी आशा व्यापाऱ्यांना होता. प्रत्यक्षात उल्हासनगरला तिसऱ्या स्तरात ठेऊन दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास सांगण्यात आली. प्रत्यक्षात शेजारी शहारापेक्षा शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी असताना, शहरातील व्यापाऱ्यांवर अन्याय का? असा प्रश्न सिंधूनगर व्यापारी असोसिएशन व सिंधूनगर व्यापारी मंडळ या व्यापारी संघटनेने केले. मंगळवारी सकाळी व्यापाऱ्यांनी डोक्याला काळ्या फित लावून राज्य शासनाच्या निर्णयाचा विरोध केला.
शहरात रात्रीचे ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली असून शासन निर्णया विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. मंगळवारी व्यापाऱ्यांनी दुकानासमोर कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम. मेरा व्यापार मेरा परिवार, भूख से मत मारो अब सरकार. अशा म्हणीचे पोस्टर लावले. तसेच रात्रीचे ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू करण्याचा परवानगी देणार नाही. तोपर्यंत व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा मानस व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.