डोंबिवली: इ.१० वी व इ.१२ वीचं निकालाचं कामकाज २० जून,२०२१ पर्यंत पुर्ण करणं गरजेचं असल्यामुळे शासनाच्या आदेशान्वये शिक्षक व शिक्षकेतर कर्मयोगी मुंबई व मुंबई उपनगरातील शाळेत लोकल प्रवासाची सवलत न दिल्यामुळे आतापर्यंत अव्वाच्यासव्वा पदरचं भाडे खर्च करुन शाळेत ईमानेइतबारे कामकाज करीत सेवा देत आहेत. पण आता ते शक्य होत नसून शिक्षकांना प्रवासात विनातिकीट पकडले गेल्यास नाहक भुर्दंड पडत आहे, त्यामुळे आता १ जुलैपासून शिक्षकांना ऑनलाइन शिकवण्यास सुरुवात करावी, किंवा त्याना रेल्वे प्रवास जाहीर करावा अशी मागणी भाजपच्या शिक्षक आघाडी, कल्याण जिल्ह्याने केली आहे. शनिवारी त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ईमेलद्वारे त्यांची व्यथा, मागणी मांडली असल्याचे संघटनेचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रभर लहान मुलांना कोरोनासंसर्गाच्या भीतीचं सावट असंच राहीलं तर महाराष्ट्रातील तमाम इ.१० वी व इ.१२ वी चे शिक्षकांप्रमाणेच कार्यालयीन कामकाजासाठी मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मयोग्यांना शाळेत १०० % आणि इ.५ वी ते इ.८ वी व इ.११ वीच्या शिक्षकांना ५०% उपस्थितीचं अट ऑनलाईन शिक्षणासाठी अत्यंत जाचक व मारक ठरणार आहे. कारण लॅपटॉप, मोबाईल व नेट सुविधा शाळेत उपलब्ध असतीलच असं नाही शिवाय शाळेत मुलंच उपस्थित नसतील तर ऑफलाईन शिक्षण तरी कसं सुरु राहिल त्यामुळे शिक्षकांचं शाळेत ५०% व १००% उपस्थितीचं नेमकं प्रयोजन काय ? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत विद्यार्थ्याना कोरोनासंसर्गाची व्यक्त केलेली भिती पाहता सातत्यपुर्ण ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने दूरदर्शन व स्वतंत्र शैक्षणिक चॅनेलची निर्मिती बरोबरच विविध संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक पावलं उचलावी आणि विद्यार्थाचं शैक्षणिक नुकसान होवू नये व ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून प्रभावी ऑनलाईन शिक्षणासाठी कोरोनासंकट संपेपर्यंत इ.५वी ते इ.१२ वीच्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. असे आवाहन कोकण विभाग संयोजक एन. एम. भामरे, सह संयोजक किशोर पाटील, आयटी सेल प्रमुख विनोद भानुशाली, जिल्हा संयोजक विनोद शेलकर, आदींनी केले आहे.