लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नारायण राणेंसोबत मी कधीही काँग्रेसमध्ये जाणार नव्हतो. उलटपक्षी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी या मंडळींनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याचा वापर केला. ही बाब लक्षात आल्यानंतर मी स्वत: जाऊन उद्धव यांना भेटून कशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग केले जात आहे, याची माहिती दिल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी केला.
राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले तेव्हा त्यांच्यासोबत खा. राजन विचारे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, असे स्पष्टीकरणही म्हस्के यांनी केले. खा. विचारे यांनी म्हस्के हे काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा सोमवारी केला होता. भास्कर पाटील हे आमच्या सोबतच असल्याचा दावा सोमवारी विचारे यांनी केला होता; परंतु मंगळवारी म्हस्के हे पाटील यांना घेऊन अवतरले.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचा एबी फॉर्म मला आला होता, विधान परिषदेचे तिकीट मला मिळत होते. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. त्यामुळे पक्षनिष्ठा आणि शिवसेना काय असते हे तुम्ही सांगू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भास्कर पाटील अवतरले
मी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे माझा भाऊ वा इतरांच्या सांगण्याला कोणताही आधार नसल्याचे भास्कर पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांची ठाणे शहर विधानसभा क्षेत्राच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.