ठाणे : भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, त्यात आता महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी टेमघर माजिवडा दरम्यान मुख्य जलवाहीनीला गळती सुरु झाली आहे. त्यामुळे ठाण्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आणखी परिणाम झाल्याचे दिसून आले.
पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ झाल्याने ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर ९ जुलै पासून परिणाम झाला आहे. ठाण्यात टप्याटप्याने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी टँकरचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
महापालिकेच्या माध्यमातून येथील गाळ काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. ते काम आता अंतिम टप्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यानुसार ११ जुलैपर्यंत म्हणजेच गुरुवार पर्यंत पाणी पुरवठा अनियमित होईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. हे दुरुस्तीचे काम सुरु असतांनाच बुधवारी सकाळी ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाºया मुख्य जल वाहिनीमध्ये टेमघर-माजिवडा दरम्यान गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था बंद करण्यात आली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.
दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने सांगितले. परंतु ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान ही दुरुस्ती आणि पंपिंग स्टेशन मधील गाळ सफाई या कामामुळे गुरुवार, ११ जुलैपर्यंत पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.