ठाणे: डायघर भागातील शिबलीनगर, आझाद कॉम्पलेक्समधील एका घरात चोरी करणाऱ्या चाँद चौहान (२०, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) आणि सतबीर चौहान (६७, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या दोघांना डायघर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ५० हजारांचे ८५ ग्रॅम सोने आणि ३० हजारांचे ४०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. दोघांनाही चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
आझाद कॉम्पलेक्समधील रहिवासी अब्दुल्ला चौधरी यांच्या घरी २४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ८० हजारांच्या ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या हारासह चार लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने तसेच ३० हजारांच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी १० मे रोजी डायघर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, पोलीस हवालदार धनंजय मोहिते, हेमंत भामरे, पोलीस नाईक गोविंद पाटील, राकेश सत्रे, सुशांत पाटील, कृष्णा बोराडे तसेच अंमलदार राजेंद्र सोनवणे आणि महेंद्र बरफ आदींच्या पथकाने मुंब्रा भागातून चाँद आणि सतबीर या दोघांना ६ जुलै २०२१ रोजी अटक केली. त्यांच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.