भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने मुख्यालयासह काही ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मुंबईच्या धर्तीवर सरकारने संपूर्ण शहरात ही सुविधा मोफत द्यावी, या मागणीचे पत्र मनपा संगणक विभागाने सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेटच्या आॅप्टिकल फायबर केबल्स अनेक खाजगी कंपन्यांनी जमिनीखाली टाकल्या आहेत. या कंपन्यांनी किमान पालिका कार्यालयांना वायफायची सुविधा मोफत पुरवण्याचा सरकारी आदेश असतानाही त्याकडे प्रशासनाने अद्याप दुर्लक्ष केले आहे. त्यातच, पालिकेने कर्मचाऱ्यांसाठी ठरावीक कंपन्यांचे नेटवर्क घेतले आहे. सुरुवातीपासूनच या कंपन्यांकडून मोफत इंटरनेट, कनेक्टिव्हिटी अथवा वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला नाही. दरम्यान, पालिका मुख्यालयात ठाणे पालिकेच्या धर्तीवर मोफत वायफाय सुविधा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी केली होती. त्याकडेही दुर्लक्ष केले. मात्र, पाठपुराव्यामुळे वर्षभरानंतर पालिका मुख्यालयासह कनाकिया येथील नगररचना कार्यालयात मोफत वायफाय सुविधा सुरू झाली. तत्पूर्वी व्होडाफोनने मुख्यालय व कनाकिया येथील कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली. यानंतर, प्रशासनाने महापौर गीता जैन यांच्या मागणीनुसार ११ उद्यानांत मोफत सुविधा उपलब्ध दिली. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात वायफाय सुविधेला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)
मीरा-भार्इंदरमध्येही मोफत वायफाय द्या
By admin | Published: January 24, 2017 5:23 AM