कल्याण : टोलवसुली करणाऱ्या कंपन्यांशी यापूर्वीच्या सरकारने करारनामे केलेले आहेत. त्यामुळे मुंब्रा बायपासच्या कामांमुळे ठाण्याहून ऐरोली, मुंबई किंवा पालघरच्या दिशेने जाणाºया टोलवरील वसुली बंद करता येणार नाही, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोल बंद करण्याची मागणी केली होती आणि सोमवारपर्यंत तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.मुंब्रा बायपास दुरुस्तीसाठी दोन महिने बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक पर्याय्ांी मार्गांवर वळवली आहे. वाहतुकीचे नियोजन केले आहे. बायपासच्या उड्डाणपुलांच्या खांबांची कठड्याची दुरुस्ती गरजेची होती. रस्तेही दुरुस्त करणे आवश्यक होते, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे. शिवाय वाहनांना दुहेरी टोल भरावा लागू नये, याची काळजी सरकारने घेतली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. आव्हाड यांचे आंदोलन हा नंतरचा विषय आहे, असे म्हणत त्यांनी त्याबाबत फारसे काही वक्तव्य केले नाही.
पर्यायी रस्त्यांची टोलवसुली बंद होणार नाही - शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 4:54 AM