लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीचेदेखील सीमोल्लंघन झाले आहे. एसटीच्या बस आता राज्यभर पुन्हा धावू लागल्या आहेत, तर राज्याबाहेर ठाण्यातून सध्या एकच बस धावण्यास सुरुवात झाली आहे; परंतु एसटीचे सीमोल्लंघन झाले असले तरीदेखील अद्यापही प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सध्या एसटीने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण ५१ टक्के आहे, तर भिवंडी-बोरिवली, मुंबई या बसलाच प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राज्यात इतर ठिकाणी शनिवारी आणि रविवारी असलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नावर आणि फेऱ्यांवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागात ठाणे आगार १-२, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि बोरिवली असे आगार आहेत. दिवसाला ५५० गाड्यांची या आगारातून राज्यभर वर्दळ सुरू असते. दिवसाला या गाड्या अंदाजे एक लाख ५८ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. पहिल्या लॉकडाऊनला प्रवासी संख्या घटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊननंतर एसटीच्या उत्पन्नावर कुऱ्हाडच कोसळली.
सध्या एसटीच्या ४०३ बस निघत असून , त्यांच्या २४०० फेऱ्या होत आहेत, तर रोजच्या रोज ३५ हजार कि.मी.च्या आसपास या बस धावत आहेत. त्या प्रामुख्याने ठाणे, मुंबई, पनवेल, वाडा आदी मार्गांवर धावत आहेत. त्यामुळे साधारण दिवसाला ४१ हजार किलोमीटरचा प्रवास होत आहे. लॉकडाऊन आणि प्रवासी नसल्याने एक लाख १७ हजार किलोमीटर प्रवासावर महामंडळाच्या ठाणे विभागाला पाणी सोडावे लागत आहे. बसमध्ये ४२ सीट नेण्यास परवानगी आहे. मात्र, स्टँडिंग प्रवासी वाहतुकीला बंदी आहे. त्यातच, प्रवाशांनीच पाठ फिरविल्याने बहुतांश लांब पल्ल्याचे मार्ग बंद आहेत. जर एखाद्या मार्गावर २१ प्रवासी असतील तर त्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्या मार्गावर बस सोडली जात आहे.
एसटीचे जिल्ह्यात ३४०० कर्मचारी आहेत.
एसटीच्या ताफ्यात ४५० बस असल्या तरी त्यातील १३० बस या महाराष्ट्र राज्यातील असून, इतर राज्यांच्या ४ आणि ठाणेअंतर्गत ३१६ बस विविध मार्गावंर धावत आहेत. इतर राज्यांमध्ये भिवंडी ते विजापूर, ठाणे ते बेळगाव, ठाणे ते गाणगापूर आणि ठाणे ते हैदराबाद या बसचा समावेश आहे. वीकेंड लॉकडाऊनमध्ये लांब पल्ल्याच्या मार्गांना ब्रेक लावला होता; परंतु आता यातील ठाणे ते हैदराबाद या मार्गावर बस सुरू झाली आहे, तर राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या मार्गांवर बस सुरू असल्या तरीदेखील प्रवाशांनी पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यातील एकूण आगार - ८
एकूण बस - ५५०
सध्या सुरू असलेल्या बस - ४०३
रोज एकूण फेऱ्या -२४००
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बस -१
पुन्हा तोटा वाढला
राज्यात निर्बंध लावल्याने एसटीच्या उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी फारसा प्रतिसाद दिसत नाही. त्यातही भिवंडीत गुरुवारी सुटी असल्याने त्याचा परिणाम एसटीला सोसावा लागत आहे. याशिवाय व्होल्वो बसलादेखील पुणे मार्गावर प्रतिसाद मिळत नाही. शुक्रवारी प्रतिसाद मिळत असला तरीदेखील शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन आल्याने तो मिळत आहे.
परराज्यातील बससेवेला प्रवासी मिळेनात
इतर राज्यांमध्ये भिवंडी ते विजापूर, ठाणे ते बेळगाव, ठाणे ते गाणगापूर आणि ठाणे ते हैदराबाद या बसचा समावेश आहे. वीकेंड लॉकडाऊनमध्ये लांब पल्ल्याच्या मार्गांना ब्रेक लावला होता. आता यातील ठाणे ते हैदराबाद या मार्गावर बस सुरू झाली आहे; परंतु तिलादेखील सध्या काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
सर्व मार्गांवरील फेऱ्या सुरू
सध्या जिल्ह्यांतर्गत केवळ मानव विकास संसाधनच्या बस बंद आहेत. शाळा सुरू नसल्याने त्या बंद आहेत; परंतु जिल्ह्यांतर्गत किंवा राज्यातील सर्वच मार्गांवरील बस आता सुरू केल्या आहेत.
मुंबई मार्गावर गर्दीच गर्दी
ठाणे विभागातून भिवंडी ते बोरिवली आणि भिवंडी ते मुंबई या मार्गावर बस सुरू आहेत. सध्या याच मार्गावरील बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्यांची, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्तीची आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासी अधिक प्रमाणात दिसत आहेत.