जव्हार : तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प राबवून शेतीला उत्तम जोडधंदा मिळावा म्हणून रेशीम विकास प्रकल्प पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात महाराष्ट्र शासनाने राबविला. त्यासाठी रेशीम संचालनालयाचे जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय जव्हार येथे सुरू करण्यात आले आहे. याचा मोठा फायदा या आदिवासी शेतकऱ्यांना व्हावा व त्यांच्या उत्पन्नात भर पडून विकास व्हावा. मात्र, या जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयातील रेशीम अधिकारी कार्यालयात बसत नाही, त्याला सतत टाळे असते.पालघर जिल्ह्यातील रेशीम उद्योग कोष व तुती लागवड हे रेशीम उद्योग जिल्हा कार्यालय जव्हारमध्ये आहे. परंतु, जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील बऱ्याच आदिवासी शेतकऱ्यांना हे रेशीम उद्योग कार्यालय कुठे आहे, हे माहीत नाही. हे जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय एका खाजगी इमारतीमध्ये आहे. मात्र, कार्यालयाच्या बाहेर बोर्डही नाही. तशात हे रेशीम उद्योग कार्यालय सतत बंद असल्याने ते शोधूनही सापडत नाही. या जिल्ह्याच्या रेशीम उद्योग कार्यालयात जिल्हा रेशीम अधिकारी प्रिया नाईक आहेत. मात्र, या अधिकारी या कार्यालयात कधीच बसत नाहीत. त्यांच्याकडे काही काम असल्यास कार्यालयाच्या बंद दरवाजावर संपर्क नंबर लिहून ठेवला आहे. त्यामुळे या रेशीम उद्योगाचा गलथान कारभार उजेडात आला आहे. म्हणून येथील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या तालुक्यात फक्त ३० शेतकरी रेशीम उद्योग करीत आहेत. कार्यालयात अधिकारीच बसत नसल्याने शेतकऱ्यांना याविषयी काही माहिती मिळत नाही. तर येथील जास्तीतजास्त शेतकरी अशिक्षित असल्याने हे कार्यालय कुठे आहे, हेही सापडत नाही. त्यामुळे येथील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)नियुक्त अधिकारी आहेत कुठे?जव्हार येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात जिल्हा रेशीम उद्योग अधिकाऱ्यांसह एकूण ५ कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु, यापैकी १ क्लर्क व १ शिपाई असे दोघे जण कधीतरी येथे उपस्थित राहतात. जिल्हा रेशीम अधिकारी हे कधीच येत नाहीत. तर त्यांची कार्यालयीन कामे व इतर कामे त्यांच्या घरी ठाणे येथे जाऊन करून घ्यावी लागत आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांना भेटण्याचा वारंवार प्रयत्न गरजू शेतकऱ्यांनी केला, मात्र ते कधीच दिसले व भेटले नाही. त्यामुळे येथील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. वरिष्ठच बेपत्ता रहात असल्याने त्यांच्या हाताखालच्या मंडळींचीही दांडीयात्रा नित्य सुरू असते.माझ्याकडे पालघर व ठाणे या दोन जिल्ह्यांचा कार्यालयीन कारभार असल्याने माझी धावपळ होत आहे. तरी मी माझ्या पद्धतीने या भागातील शेतकऱ्यांना जास्तीतजास्त सहकार्य व मदत करीत आहे. - प्रिया नाईक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जव्हार
रेशीम उद्योग कार्यालयाला नेहमीच कुलूप
By admin | Published: July 27, 2015 10:59 PM