बदलापूर : अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदांची एकत्रित महापालिका करण्यासंदर्भात राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भातील माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून राज्य शासन या दोन्ही शहरांची एकत्रित महापालिका जाहीर करण्याच्या विचारात आहे. शासनाच्या या निर्णयाला बदलापूरकरांनी विरोध केला आहे, तर अंबरनाथकरांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे लागून असल्याने त्यांच्या एकत्रित महापालिकेचा प्रस्ताव गेल्या ५ वर्षांपासून चर्चेत होता. मात्र, २०१५ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. मात्र, या निवडणुकांना ६ महिने उलटत नाही तो पुन्हा महापालिकेचे वेध राज्य शासनाला लागले आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरची एकत्रित तर पनवेल ही नवी महापालिका स्थापन करण्याचा तारांकित प्रश्न आमदार नसीम खान, अमिन पटेल, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शासनाने सर्व माहिती संकलित केली आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांची लोकसंख्या, तसेच भौगोलिक रचना लक्षात घेता महापालिकेच्या अनुषंगाने अनुकूलता दर्शवली आहे. (प्रतिनिधी)वेगवेगळ्या प्रतिक्रियाबदलापुरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निर्मितीच्या वाटचालीला विरोध केला आहे. भाजपाचे नगरसेवक संभाजी शिंदे यांनी एकत्रित महापालिकेपेक्षा बदलापूर पालिकेची हद्दवाढ करण्याची गरज व्यक्त केली आहे.हद्दवाढीचा निर्णय झाल्यास भविष्यात बदलापूर स्वतंत्र महापालिका होऊ शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अंबरनाथ-बदलापूर एकत्र पालिकेचा प्रस्ताव
By admin | Published: December 01, 2015 12:58 AM