- पंकज पाटीलअंबरनाथ : फेरीवाला धोरण अवलंबण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने नुकतीच फेरीवाल्यांची नोंदणी सुरू केली आहे. या नोंदणीत एक हजार ७० च्या वर फेरीवाल्यांची नोंद झाली आहे. पाच वर्षांपूर्वी शहरात ५०० च्या घरात फेरीवाले होते. हा आकडा आता दुपटीवर गेला आहे.
अंबरनाथ शहरात पूर्वी हे फेरीवाले स्टेशन परिसरात सर्वाधिक प्रमाणात दिसत होते. शहराच्या अंतर्गत भागांतही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच फेरीवाले होते. मात्र, शहर वाढत असताना आता फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. शहरात फेरीवाल्यांचा त्रास वाढल्याने त्यांच्यावर पालिकेमार्फत सातत्याने कारवाई करण्यात येत होती. त्या कारवाईला फेरीवाल्यांकडून विरोध होत होता.
शहरात फेरीवाला धोरण अवलंबले न गेल्याने पालिकेला सातत्याने जाब विचारण्यात येत होता. अखेर, गेल्यावर्षी अंबरनाथ पालिकेने फेरीवाला धोरण अवलंबण्याच्या अनुषंगाने शहरातील सर्व फेरीवाल्यांच्या नोंदीचे काम हाती घेतले होते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही तयार केली. प्रत्येक फेरीवाल्याची जागा आणि त्यांची माहिती संकलित करण्याचे काम करण्यात आले. या कामात अनेक अडथळेदेखील आहेत.
अनेकांनी त्याला विरोधही केला. तर, काहींनी सर्वेक्षण करणाऱ्यांना धमकाविण्याचेही काम केले. त्यामुळे सुरक्षारक्षकांची मदत घेऊन हे काम करण्याची वेळ पालिकेवर आली होती. या प्रकारात सर्वाधिक त्रास स्टेशन परिसरात सर्व्हे करताना झाला. तरीही पालिकेने ते काम पूर्ण केले. फेरीवाल्यांची माहिती घेतल्यावर त्यांना संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.
स्टेशन परिसर होणार फेरीवालामुक्त
अंबरनाथ पालिका क्षेत्रात स्टेशन परिसरासह शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाल्यांची नोंद पालिकेने केली आहे. या फेरीवाल्यांचा आकडा आता १ हजार ७० च्या घरात गेला आहे. त्यातील ७०० हून अधिक फेरीवाल्यांनी आपली कागदपत्रे पालिकेकडे सादर केली आहेत. त्या कागदपत्रांची पालिकेने छाननी केली आहे. मात्र, ३०० हून अधिक फेरीवाल्यांनी अद्याप पालिकेकडे आपली कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी संधीही देण्यात आली आहे.
पालिकेने कागदपत्रे सादर केलेल्या फेरीवाल्यांची यादी जाहीर करण्याचे काम हाती घेतले आहे. या नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी शहरात कोठे जागा देता येईल, याचाही विचार सुरू आहे. फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळावी, ही पूर्वीपासूनची मागणी होती. त्या मागणीच्या अनुषंगाने फेरीवाल्यांचा सर्व्हे सुरू करून आता त्यांना पालिकेच्या माध्यमातून अधिकृत जागा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मात्र त्याव्यतिरिक्त इतर फेरीवाल्यांना शहरात बसणे अवघड जाणार आहे. तसेच स्टेशन परिसरात फेरीवालामुक्त परिसर तयार करण्यासाठीही पालिका प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नोंदणीकृत फेरीवाल्यांना स्टेशन परिसरात जागा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.फेरीवाला धोरण अवलंबण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. फेरीवाल्यांची नोंदणी करणे अवघड जात होते. मात्र, ते काम आता पूर्ण करण्यात आले आहे. पालिकेने यशस्वीरीत्या अशा प्रकारची नोंदणी प्रथमच केली आहे. आता धोरण अवलंबणे सोपे होणार आहे.- देविदास पवार, मुख्याधिकारी, अंबरनाथ