शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी; भाजपाही काढणार वचपा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:39 AM2020-03-09T00:39:51+5:302020-03-09T00:40:58+5:30

अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेनेची या दोन्ही नगरपालिकांत सत्ता असून महाविकास आघाडीतील सेना हा महत्त्वाचा घटक असल्याने दोन्हीकडील सत्ता राखण्याचा शिवसेना कसोशीने प्रयत्न करील. या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळाचा नारा देऊन आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Ambarnath, everyone's slogan to try strength in Badlapur pnm | शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी; भाजपाही काढणार वचपा

शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी; भाजपाही काढणार वचपा

Next

पंकज पाटील, अंबरनाथ

सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याचे गणित जुळवणे आता सुरू झाल्याचे चित्र यंदाच्या पालिका निवडणुकीत दिसणार आहे. शहरात पक्षवाढीचे प्रयत्न सर्वच पक्ष करीत आहेत. जोडतोडीच्या राजकारणामुळे कोण कोणासोबत जाईल, याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे आपली ताकद सर्वाधिक वाढविण्यासाठी शहरातील सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. अंबरनाथ असो वा बदलापूर या दोन्ही शहरांत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, शिवसेनेला शह कसा देता येईल, याचा विचार करून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सध्या मात्र निवडणूक लढवताना स्वबळाचा नारा देत आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांत आघाडी आणि युतीबाबत कोणतीही चर्चा नाही. शहरात जी काही चर्चा रंगली आहे, ती फक्त स्वबळाची. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी होणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र, स्थानिक पातळीवर सत्ता स्थापन करणे, हेच प्रत्येक पक्षाचे ईप्सित असल्याने ऐनवेळी कोणता पक्ष कुणासोबत जाणार, याची शाश्वती कोणीच देत नाही. त्यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडीचा धर्म बाजूला ठेवत स्वबळाची चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसला शिवसेनेसोबत जाताना आपल्या अनेक इच्छुकांची मने मारावी लागतील. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या विरोधात काँग्रेसच्या अनेक इच्छुकांनी लढण्याची तयारी केलेली आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही पक्ष कोणत्या मुद्द्यावर एकत्रित येणार, हा प्रश्नच आहे. भाजपदेखील स्वबळाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भाजपला शिवसेनेसोबत जाणे हे वरिष्ठांच्या आदेशामुळे शक्य नाही. त्यातच भाजपची अनेक प्रभागांत लढाई शिवसेनेच्या उमेदवारासोबतच राहणार आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेसोबत जाणे शक्य होणार नाही. राष्ट्रवादीला मात्र अजूनही शिवसेनेची दारे चर्चेकरिता उघडी आहेत. राष्ट्रवादी ज्या प्रभागात इच्छुक आहेत, त्यातील एखाददुसऱ्या प्रभागातच शिवसेनेचा विद्यमान नगरसेवक आहे. शहराध्यक्ष आणि त्यांचे पुत्र ज्या प्रभागात इच्छुक आहेत, त्यातील एक प्रभाग शिवसेनेचा तर दुसरा अपक्ष उमेदवाराचा आहे. त्यामुळे त्यातील एक जागा ही राष्ट्रवादीला सोडणे शक्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाणे शक्य होणार आहे. मात्र, अंबरनाथमध्ये मनसेची अवस्था अवघडल्यासारखी झाली आहे. भाजपसोबत गेल्यास मनसेला काही प्रमाणात आधार मिळणार आहे. मात्र, भाजप स्वबळाचा नारा देत असल्याने मनसेलाही नाइलाजास्तव स्वबळाचा नारा द्यावा लागणार आहे. आजच्या घडीला सर्वच पक्ष हे स्वबळाचा नारा देत असले तरी आचारसंहिता लागल्यावर आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित झाल्यावर आघाडी आणि युतीची सूत्रे जलदगतीने फिरणार आहेत. आज स्वबळाचा नारा देणे, हे आपली ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातील काही पक्ष हे खरोखरच स्वबळावर झेप घेणारे ठरणार आहेत. काही पक्षांना त्याचा फटकादेखील बसणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत स्वबळाचीच चर्चा आहे.

बदलापुरात परिस्थिती वेगळी नाही. तेथे शिवसेना आणि भाजप हे रिंगणातील मुख्य पक्ष आहेत. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीची ताकद शहरात आहे. मात्र, शहराची परिस्थिती पाहता बदलापुरात शिवसेना आणि भाजप यांची लढत निश्चित मानली जात आहे. मात्र, हे दोन प्रमुख पक्ष निवडणूक लढवत असताना त्या पक्षांसोबत जाऊन स्वत:चा पक्ष सावरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि मनसे करणार आहेत. बदलापुरात काँग्रेसची अवस्था बिकट असली, तरी आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून एखाददुसरी जागा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास इच्छुक असली, तरी शिवसेना त्यांना जवळ खेचण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापुरात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार की, भाजप किंवा शिवसेनेची साथ देणार, ही चर्चा रंगली आहे. मात्र, दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना राष्ट्रवादीला बाजूला सारल्यास बदलापुरात काही प्रभागांत तिरंगी लढत होणार आहे. शहरातील अनेक प्रभागांत शिवसेना आणि भाजप अशी सरळ लढतच निश्चित मानली जात आहे.

Web Title: Ambarnath, everyone's slogan to try strength in Badlapur pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.