महाविकास आघाडीचा पाया रचला अंबरनाथमध्ये, पालिकेत एकत्र येत केली विकासकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 01:33 AM2019-11-29T01:33:56+5:302019-11-29T01:34:50+5:30
राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अंबरनाथ : राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अंबरनाथ पालिकेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन शहर विकासाची काम करीत असल्याचे पाहावयास मिळते.
२०१५ मध्ये अंबरनाथ पालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी आणि त्यानंतर २०१७ मध्ये अशा दोन वेळा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही वेळेस ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला
होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेली नगरसेवकांची पळवापळवी थोडक्यात म्हणायचे तर झालेला घोडेबाजार लक्षात घेऊन त्यानंतरच्या निवडणुकीत शहर विकासासाठी आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
जानेवारी २०१७ मध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रभागात काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाचा तसेच विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा झाला होता. या कार्यक्र माला पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व शहर अध्यक्ष सदाशिव पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्र मात भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. कार्यक्र माच्या बॅनरवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे झळकली होती.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात लावलेल्या बॅनरचा आवर्जून उल्लेख केला होता. शहर विकासासाठी पक्षभेद विसरून काँग्रेसने लोकप्रतिनिधींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे. याचा राज्याने आदर्श घ्यावा असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यांचे हे वाक्य आज
खरे ठरले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेत मध्येच गटबाजी निर्माण झाल्याने त्याठिकाणी सत्तेचे समीकरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सत्तेत भाजपनेही पुढाकार घेऊन शिवसेनेच्या एका गटाच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपची ही खेळी
हाणून पाडण्यात पुन्हा एकदा काँग्रेसने पुढाकार घेतला होता. नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पाठिंबा देत सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे पाठिंबा देत असताना कोणतेही
पद काँग्रेसने स्वीकारले नव्हते.
पाच वर्षे एकत्र
गेल्या पाच वर्षात झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्रित निवडणूक लढवत आली आहे. अशा परिस्थितीत राज्यात निर्माण झालेली महाविकास आघाडी त्याचा पाया हा अंबरनाथमधील रचला गेला असे
म्हटले तर वावगे ठरणार नाही