सदानंद नाईक, उल्हासनगर: डॉ आंबेडकर साहित्य समीक्षक व साहित्यिक हरेश खंडेराव यांचे वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले असून यावेळी डॉ आंबेडकर चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उल्हासनगरात स्थायिक झालेले हरेश खंडेराव हे मुंबई आकाशवाणीत उच्च अधिकारी होते. त्यांच्या आकाशवाणी वरील कार्यक्रमाला अमाप प्रसिद्ध मिळाली होती. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४७ ला नारखेड, नांदुरा जिल्हा- बुलडाणा येथे झाला असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात त्यांना मिलिंद कुमार म्हणून गौरविण्यात आलेले होते. आंबेडकर साहित्यिक समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले खंडेराव यांनी अनेक पुस्तके लिहिली. आजपर्यंत त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून काही प्रकाशित होणे बाकी आहेत. त्यांच्या एकूण साहित्यावर मान्यवर साहित्यिकांच्या समिक्षांचे संपादन साहित्यिक आनंद चक्रणारायन यांनी मागील वर्षी केलेले असून महाराष्ट्रभर त्या ग्रंथावर ठिकठिकाणी चर्चासत्र आयोजित केले होते.
प्रसिद्ध समीक्षक व साहित्यिक हरिष खंडेराव प्रसिद्धीलोलुप कधीच नव्हते. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही ग्रंथावर लेखकाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो व परिचय त्यांनी टाकलेला नाही. शिवाय त्यांच्यावर लिहिलेल्या वा संपादन केलेल्या ग्रंथावर सुद्धा टाकू नका म्हणून त्यांनी संपादकास सूचना केली होती. त्यांच्या निधनाने डॉ आंबेडकर साहित्यिकात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया प्रा. संजय अभ्यंकर यांनी दिली. सुभाष टेकडी परिसरात आंबेडकर साहित्यिकांची देणगी असून त्यांच्या विचारांवर सर्वांनी चालायला हवे. असेही अभ्यंकर म्हणाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला नामवंतांसह शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.