डोंबिवली : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंत यांच्या नावे असलेली जमीन बळकावल्याप्रकरणी एकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तीन महिन्यापूर्वी आंबेडकरांचे नातू भीमराव आंबडेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पण त्यांच्या तक्रारीची स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांना पोलीस उपायुक्तांशी बोलावे लागले. तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल झाला. घटनेच्या शिल्पकाराच्या नातवालाच पोलीस अशी वागणूक देत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या नावे मौजे गोळवली सर्व्हे नंबर ६९ भूमापन क्रमांक ८ ह, येथील प्लॉट नंबर १३ (अ), प्लॉट नंबर ११ आणि प्लॉट नंबर ५ हा भूखंड आहे. तो त्यांच्या मालकीचा आहे हे माहीत असूनही या जागेवर सुरेंद्र पाटील (रा. अनुसया निवास, चोळेगांव, ठाकुर्ली) यांनी आंबेडकर यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अतिक्रमण करुन तीन मजली इमारत बांधली. या प्रकरणी भीमराव आंबेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात सुरेंद्र पाटीलविरोधात भादंवि कलम ४२०, ४४७, ४६५, ४६८, ४७१ यासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला.या संदर्भात आंबेडकरांचे नातू भीमराव आंबडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, या प्रकरणाची तक्रार त्यांनी तीन महिन्यांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात दिली होती. त्याची दखल स्थानिक पोलीस ठाण्याने घेतली नाही. अखेरीस पोलिस उपायुक्तांच्या कानावर हा प्रकार घातला असता त्यांनी दखल घेतली. तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल झाला.>मानपाडा पोलिसांकडे या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भीमराव हे आंबेडकरांचे नातू आहेत याविषयी आम्हाला काही कल्पना नाही. आता गुन्हा दाखल झाला आहे. तीन महिने हेलपाटे घालून वरिष्ठांशी बोलल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. ज्यांना दाद मागणे शक्य नाही, त्यांची अवस्था कशी होत असेल, हेच यातून पुढे आले.
आंबेडकरांच्या मुलाचीच जमीन बळकावली, नातवाला बोलावे लागले वरिष्ठांशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:34 AM