लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. शहर हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पालिकेने दोन वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर शहर हागणदारी मुक्त करण्यात यश आले. केंद्र सरकारच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर शहर हागणदारीमुक्त झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक घरात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात आले. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. स्वच्छतागृहांची स्थिती सुधारल्याने उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर पालिकेने भरारी पथक तयार करून उघड्यावर बसणाऱ्यांवर कारवाई केली. या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली. राज्य सरकारने या कामाचा गौरव करत अंबरनाथ शहराला पुरस्कारही दिला. तर केंद्र सरकारच्या पथकाने शहराची पाहणी करून उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची माहिती घेतली. त्यात अंबरनाथमध्ये चांगले काम झाल्याचे समोर आले. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने दखल घेतली आहे. यापुढेही शहरात उघड्यावर कोणी प्रातर्विधीसाठी जाणार नाही त्याची दक्षता घेतली जाईल. - देविदास पवार, मुख्याधिकारी.
अंबरनाथ झाले हागणदारीमुक्त
By admin | Published: July 08, 2017 5:34 AM