अंबरनाथ - आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्वभागातील महालक्ष्मीननगर गॅस गोडाऊन परिसरात एक भिंत पडून दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एका मृत व्यक्तीचे नाव गोविंद केसलकर असं आहे. तर दुसऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. ही भिंत एका चालिला लागूनच असल्याने मोठा अपघात घडला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सहा महिन्यापूर्वीच पालिका प्रशासनाच्या वतीने ही भिंत बांधण्यात आली होती. पालिकेच्या निकृष्ट कामामूळे दोघांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मी नगर परिसरात पालिकेचे उद्यानाची भिंत सहा महिन्यापूर्वीच उभारण्यात आली होती. एका चाळीला लागुनच ही भिंत उभारली होती.
भिंत आणि चाळीच्यामध्ये छोटीशी गल्ली असल्याने तिथून नागरिकांचा वावर सतत सुरू होता. आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने या पावसात पालिकेने बांधलेली भिंत चाळीवर पडली. यावेळी त्या गल्लीतून जाणारा दोन पादचाऱ्यांनवर ही भिंत कोसळल्याने ते दोघेही भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सुरुवातीला केवळ भिंत पडल्याची आणि त्यात वाहने गाडले गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र ढिगारा उपासत असताना दोघांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या दोघांचे नावे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे पालिकेच्या निकृष्ट भिंतीच्या कामामुळेच हा बळी गेल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.