पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ नगरपरिषदेने तीन वर्षांत अर्थसंकल्पाला बगल देऊन मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा कोलमडला आहे. चालू आर्थिक वर्षातही उत्पन्नापेक्षा जास्त खर्च झाल्याने अनेक विकासकामांची बिले थकली असून या वर्षात पालिकेला नवीन विकासकामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची मोठी गोची झाली आहे.गेल्या तीन वर्षांत ६० कोटींहून अधिकचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते विकसित करण्याचे काम केले आहे. मात्र, ते करताना शासकीय अनुदानाची मदत न घेतल्याने हा सर्व खर्च पालिकेच्या तिजोरीतून करावा लागला आहे. शहरात रस्त्याचे काँक्रीटीकरण होत असल्याचे दिसत असले तरी अनेक कामांची बिले अद्याप अदा केलेली नाहीत. त्यातच, नव्या कामांचे आदेश दिले असलेतरी त्यांची बिलेदेखील अदा करावी लागणार आहेत. मात्र, या वर्षातील अर्थसंकल्पात जी तरतूद केली आहे, त्यापेक्षा जास्त कामे पालिकेने केली आहेत. त्यामुळे ठेकेदारांना बिलांसाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.>> या वर्षात पालिकेतील प्रलंबित बिलांचा आकडा हा २१ कोटी ७८ लाखांवर आहे. तर, शहरात सुरू असलेल्या कामांची २४ कोटी ६३ लाखांची बिले पालिकेकडे येणार आहेत. ती देण्यासाठी पालिकेकडे निधीच शिल्लक राहिलेला नाही. मार्चअखेरपर्यंत पालिकेला येणारे अनुदान आणि गोळा होणारा कर यांचा आकडा एकत्रित करून ही बिले अदा केली तरी पालिकेला ३४ कोटींची तूट भरून काढावी लागणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात नवीन कामे करणे अवघड जाणार आहे.>> अर्थसंकल्पातील तरतूदीपेक्षा जास्तीची कामे घेतल्याने आर्थिक तूट निर्माण झाली आहे. झालेल्या कामांची बिले अदा केल्यावर नव्याने निधीच्या उपलब्धतेप्रमाणेच कामे केली जातील. ओव्हर बजेट कामे टाळण्याचा आमचा प्रयत्न राहील.- गणेश देशमुख, मुख्याधिकारी, नगरपरिषद अंबरनाथ
अंबरनाथ : आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या
By admin | Published: October 16, 2015 2:05 AM