पंकज पाटील।अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने शहरात काँक्रिट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मात्र, ही कामे करताना जे रस्ते विकास आराखड्यात (डीपी) दर्शवण्यात आले आहेत, त्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना नियोजनाप्रमाणे त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, पालिकेने उलनचाळ रस्त्याचे रुंदीकरण न करताच काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण रखडणार आहे.उलनचाळ येथील डीपी रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. रस्त्याचे काम करताना तेथील अतिक्रमण हटवत मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर विकास आराखड्यात जे रस्ते समाविष्ट आहेत, त्यांचे रुंदीकरण केल्यावरच काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, अंबरनाथ पालिका क्षेत्रात ज्या महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे, त्या रस्त्याच्या आड येणारे कोणतेच अतिक्रमण हटवलेले नाही.अंबरनाथमधील उलनचाळ ते कोहोजगाव हा रस्ता विकास आराखड्यात असतानाही रुंदीकरण झालेले नाही. आधी रस्ता आणि नंतर रुंदीकरण अशी रस्त्याची अवस्था आहे. त्यामुळे रुंदीकरणास विरोध झाल्यास कंत्राटदार रस्ता करून निघून जाण्याच्या तयारीत आहे. रुंदीकरण न करताच काँक्रिटीकरणाचा सपाटा पालिकेने लावला आहे. असाच प्रकार अंबरनाथ पूर्व भागातील भीमनगर ते कानसई एएमपी गेटपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मंजूर केले आहे. त्या रस्त्याचे भूमिपूजनही झाले आहे. त्या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या तयारीत पालिका प्रशासन आहे. मात्र, अद्याप अतिक्रमण काढलेले नाही. याच रस्त्याच्या मुद्यावर राजकारणदेखील तापलेले असल्याने हा रस्ताही अर्धवट अवस्थेतच काँक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. शहरात याआधी झालेल्या काँक्रिट रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याकडेही पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. कोहोजगाव नाक्यावरील अतिक्रमणाबाबत न्यायालयीन दावाही प्रलंबित आहे. या दाव्याकडेदेखील दुर्लक्ष होत आहे.नगररचना विभागाची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत ठोस निर्णय घेणे. मात्र, हे विभाग केवळ बांधकाम परवानगी देण्यातच व्यस्त झाल्याने सर्व कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. गावदेवी रस्ता आणि हनुमान मंदिर रस्ता वगळता इतर कोणत्याच रस्त्यांचे नियमाप्रमाणे काँक्रिटीकरण झाले नाही.दोन वृक्षांची केली छाटणीउलनचाळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याकडे दुर्लक्ष करत या रस्त्याच्या आड येणारे दोन मोठे वटवृक्ष कापण्याची घाई मात्र पालिकेने लागलीच केली आहे. अतिक्रमण काढल्यावर वृक्षांची छाटणी शक्य असताना पालिकेने आधी वृक्षछाटणी केली आहे.
अंबरनाथ पालिका : उलनचाळ रस्त्याचे रुंदीकरण रखडणार; राजकारण तापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:42 AM