अंबरनाथ: सैन्यदलांसाठी युद्धसामुग्री तयार करणाऱ्या अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीने यंदा पहिल्यांदाच ३१८ कोटींच्या उत्पादनाचे लक्ष्य गाठले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केलेले जास्त उत्पादन आणि कॉर्पोरेटायझेशन झाल्यानंतर मिळालेल्या खासगी ऑर्डर्सही याच्या जोरावर एमटीपीएफ कारखान्याने हे लक्ष्य गाठले असून पुढील वर्षी ५०० कोटींचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.
अंबरनाथ शहरात देशाच्या सैन्यदलांसाठी युद्धसामुग्री तयार करणारे ऑर्डनन्स फॅक्टरी आणि मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी हे दोन कारखाने आहेत. यापैकी ऑर्डनन्स फॅक्टरीत मिसाईलच्या नळकांड्या, फ्युज कंडक्टर्स असे साहित्य तयार केले जाते, तर एमटीपीएफ कारखान्यात रणगाड्यांचे स्पेअर पार्टस, अँटी मिसाईल सिस्टीम, एटीआर गन, बंदुकीच्या गोळ्या असे साहित्य तयार केले जाते. या दोन्ही कारखान्यांचे वर्षभरापूर्वी कॉर्पोरेटायझेशन झाले. त्यामुळे आत्तापर्यंत फक्त आपल्या देशाच्या सैन्यासाठी युद्धसामुग्री तयार करणाऱ्या या कारखान्यांना अन्य देशांना युद्धसामुग्री तयार करून देण्याचेही अधिकार मिळाले. त्यामुळे भारतीय युद्धसामुग्रीची निर्यात किंवा विक्री सुद्धा वाढणार आहे.
याच एमटीपीएफ कारखान्याने कॉर्पोरेटायझेशन झाल्यानंतर मागील वर्षभरात ३१८ कोटी रुपयांच्या साहित्याचे उत्पादन आणि पुरवठा केला आहे. यानिमित्त आज एमटीपीएफ कारखान्यात चीफ जनरल मॅनेजर राजेश अगरवाल यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यंदा दरवर्षीच्या तुलनेत दीडपट अधिक उत्पादन झाले असले, तरी इतक्यावरच न थांबता पुढील वर्षी ५०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी राजेश अगरवाल यांनी सांगितले. तसेच या कामगिरीसाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र केलेली मेहनत आणि अधिकारी वर्गाची प्लॅनिंग हे कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"