अंबरनाथ : अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या परिसराला लवकरच नवी झळाळी मिळणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरण आणि विकासासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते.
अंबरनाथ शहराला शिवमंदिराच्या रूपाने तब्बल ९६० वर्ष जुना प्राचीन वारसा लाभला असून या मंदिराची युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या (वर्ल्ड हेरिटेज) यादीतही समावेश आहे. या शिवमंदिराच्या वास्तूचे जतन करण्यासोबतच परिसराचा विकास करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे हे पहिल्यांदा निवडून आल्यापासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नगरविकास विभागाने या परिसराच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी ४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
असा होणार शिवमंदिर परिसराचा विकास
- शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकासाचे काम दोन टप्प्यात आणि सहा भागात नियोजनबद्ध रितीने केले जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात २० कोटींची, तर दुसऱ्या टप्प्यात २३ कोटींची कामे केली जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली आहे.
- यात पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, कमान, बसस्टॉप, जंतर मंतर पार्क, भव्य पार्किंग, दोन नवे टेनसाईल सस्पेंडेड ब्रिज, वालधुनी नदीचे संवर्धन, प्राचीन कुंडाचे नूतनीकरण, पॅव्हेलियन, ॲम्फी थिएटर, फूल मार्केट उभारणे ही कामे केली जातील.
- तर दुसऱ्या टप्प्यात खेळाचे मैदान विकसित करणे, टेनसाईल रुफ, मत्स्यालय, फार्मर्स प्लाझा, संग्रहालय, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वालधुनी नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण, नदीवर विरंगुळा घाट बांधणे आणि शिवमंदिराच्या पौराणिक अवशेषांचे प्रदर्शन क्षेत्र उभारणे ही कामे केली जातील.