अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. पण, या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकला मात्र फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्यानेच या पुलावर त्यांची दादागिरी वाढल्याचे चित्र आहे. एल्फिन्स्टन येथील रेल्वे पादचारी पुलावरील अपघातानंतर सर्वच स्थानकातील पूल आणि पुलावरील फेरीवाल्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन ठोस निर्णय घेत आहे.अंबरनाथ रेल्वे स्थानकात बाहेर पडण्यासाठी दोन पादचारी पूल आहेत. मात्र, त्यापैकी कर्जत दिशेकडे असलेल्या पुलाचाच वापर ९० टक्के प्रवासी करतात. त्यामुळे या पुलावरून बाहेर पडणाºया प्रवाशांना ग्राहक बनवण्यासाठी फेरीवाले याच पुलावर आपला बाजार मांडत होते. एल्फिन्स्टनच्या प्रकारानंतर रेल्वे पुलावरून सर्व फेरीवाल्यांना बाहेर काढत रेल्वे सुरक्षा दलाने आपली जबाबदारी योग्यरीत्या हाताळली. मात्र, याच पुलाला लागून असलेला पालिकेच्या ताब्यातील स्कायवॉक मात्र फेरीवाल्यांचा आश्रयस्थान झाला आहे. रेल्वे पुलावरून हाकललेले हे सर्व फेरीवाले आता पालिकेच्या स्कायवॉकवर बसले आहेत. पालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बंदी आहे. असे असतानाही अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांत स्टेशनपासून १० मीटर अंतरापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. एवढेच नव्हे तर पादचारी पुलावरदेखील त्यांचीच गर्दी असते. पूल संपल्यावर लगेचच पुलाच्या खाली या फेरीवाल्यांनी मार्गच अडवून ठेवला आहे. ज्या ठिकाणी रेल्वेची हद्द संपते, त्या ठिकाणापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. इतकी की, स्टेशनमधून बाहेर पडणाºया रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. एवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनादेखील फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. अपघाताच्या परिस्थितीत या ठिकाणी रुग्णवाहिकादेखील येऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या फेरीवाल्यांनी निर्माण केली आहे. असाच प्रकार अंबरनाथ पश्चिमेकडे असून येथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि रस्त्याच्या मध्यभागीदेखील फेरीवाले बसलेले आहेत. अनेक गावगुंडांनी स्टेशन परिसरातील जागा अडवून त्या जागा फेरीवाल्यांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पालिका अधिकारीही या प्रकरणात गुंतले असण्याची शक्यता आहे.
अंबरनाथकर त्रस्त : स्कायवॉकला फेरीवाल्यांचा गराडा,पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:19 AM